अंकुश कोकोडे
कुरखेडा प्रतिनिधी
कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील अंगारा हा अत्यंत महत्वपूर्ण व शेवटचा गाव असून स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा तालुक्याच्या ठिकाणाहून अंगारा इथे येणारी बस अद्याप सुरु करण्यात आली नाही.
याकडे प्रशासनाचे साधे लक्ष नसल्याचा आरोप आझाद समाज पार्टी चे कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिखराम यांनी केला आहे.
यासंदर्भात आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी एसटी आगार प्रमुख राखडे यांना यापूर्वीही निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज पक्षाच्या वतीने आगार प्रमुखांना इशारा देण्यात आला.
कुरखेडा हे तालुक्याचे ठिकाण असून गावातील शेतकरी, शाळकरी मुले, इतर नागरिकांना कोणत्याही प्रशासकीय कामासाठी तहसील, पंचायत समिती मध्ये कुरखेडा येथेच जावे लागत असून विद्यार्थ्यांना सुद्धा मालेवाडा जाण्यासाठी मोठी खटपट करावी लागते.
अशा परिस्थिती मध्ये प्रशासनाने दुर्लक्ष न करता तात्काळ कुरखेडा ते अंगारा व अंगारा ते मालेवाडा अशी सकाळ, सायंकाळ बस सेवा सुरु करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सावन चिखराम यांनी दिला.
यावेळी चर्चा करताना पक्षाचे जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी, रिपब्लिकन कार्यकर्ते विजय देवतळे, सतीश दुर्गमवार उपस्थित होते.