अकोट:-
वाचनाने माणसात प्रगल्भता येते,विचारात बदल होऊन एक समृध्द,समाधानी जिवन जगण्याची कला अंगी येते.त्यामुळे प्रत्येक कुटूंबात वाचनसंस्कृती रुजली पाहीजे,त्यासाठी नवचैतन्य बहुउद्देशीय संस्थेने सुरु केलेला साप्ताहिक वाचन संस्कार उपक्रम उपयुक्त असल्याचे मत जिल्हा सहा. आयुक्त (स्काऊट),तथा समाजसेवक प्रा.विजय जितकर यांनी व्यक्त केले.
शहरातील फरकाडे नगर येथील नवचैतन्य बहू. संस्थेचा कार्यालयात साप्ताहिक वाचन संस्कार उपक्रमाचे उदघाटन सोमवारी (दि.३) करण्यात आले.यावेळी प्रा. विजय जितकर होते.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष राहुल खंडारे.राहुल तेलगोटे, अमोल तेलगोटे,विशाल गोतमारे,भिकाजी भारती, योगेश धांडे,प्रफुल कथले,विशाल तेलगोटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजय जितकर म्हणाले,”विद्यार्थी दशेत अभ्यासक्रमातील पुस्तके,किंवा वर्तमानपत्रे दररोज वाचने म्हणजे संपूर्ण वाचन नव्हे,तर वेगवेगळ्या लेखकांची विविध विषयावरील पुस्तकांचे वाचन करण्याची सवय असणे खरे वाचनप्रेमी होय. वाचनाने केवळ विचार बदलतात असे नाही तर वेगळ्या कल्पना,आशा-आकांशा निर्माण होतात. समाधानी,सुसंस्कृतपणा,आत्मविश्वास ही गुण वाचनाने मिळते.
यावेळी बोलताना राहुल खंडारे यांनी साप्ताहिक वाचन संस्कार उपक्रम सुरु करण्या मागील उद्देश सांगीतला. यावेळी ते म्हणाले, सध्याच्या आधुनिक युगात परिस्थिती नुसार व गरजेनुसार लवकर संपर्क साधता यावा म्हणून टेलिफोन, लॅपटॉप, संगणक ते मोबाईल अर्थात भ्रमणध्वनी युगात येऊन पोहोचलो आहोत. आता या मोबाईलवर केवळ बोलता येत नाही तर आभासी जगात जसे एकमेकांसमोर बसून व्हिडिओ काँफेरन्स द्वारे संवादही साधता येत आहे. मग ऑफिस वर्क, टेलमेडिसीन नंतर कोविड काळात ऑनलाईन शिक्षण सोबत याची गरज अत्यंत वाढत गेली. पण दुर्दैवाने बघता बघता आपण सर्वच केंव्हा या मोबाईल/स्मार्टफोन च्या अधीन कधी आणि कसे झालो ते कळलेच नाही.
परंतु आजही काही व्यक्तिमत्त्व केवळ विद्यार्थी किंवा तरुणच नव्हे तर आपल्या सारख्या सर्वांनाच वाचनसंस्कृती जोपासण्यातुन विविध वाचन उपक्रमांद्वारे एकप्रकारे Detox Therapy देत आहेत.
मोबाईलच्या या आभासी जगात स्वतः पूर्णपणे गुंतून जाण्यापेक्षा वाचन उपक्रमाद्वारे आपण आपले मानसिक व बौद्धिक स्वास्थ्य चांगले ठेऊ शकतो.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवचैतन्य संस्थेचे सतीश भोजने, विजय गावंडे,सचिन दामोदर, सुधीर कठाने,सरफराज खान,जस्सीम जमादार यांनी परिश्रम घेतले.