दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : अनेक वारकरी बांधवांची इच्छा असते की, आपला अधिक काळ श्रीक्षेत्र पंढरपूर किंवा आळंदी येथे व्यतित करावा. त्यामुळे अशा वारकरी बांधवांसाठी सुखात राहता यावं; यासाठी लवकरच लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार आहे अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आषाढी वारी नंतर हभप चंद्रकांत वांजळे गुरुजींच्या उपस्थित भूमिपूजन करुन, सदर इमारतीच्या कामाची सुरुवात करण्यात येईल, असा संकल्प याप्रसंगी व्यक्त केला.
आपल्या संस्कृतीत साधू-संतांची सेवा ही ईश्वरची सेवा आहे असं समजलं जातं.आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीला जाणाऱ्या प्रमुख दिंड्यांच्या प्रमुखांची पाद्यपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी वारीसाठी आवश्यक साहित्य भेट म्हणून दिले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की आषाढी वारीचे महत्त्व सर्वांना समजावून सांगण्यासाठी यंदाच्या आषाढी वारीदरम्यान तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित उत्तम नाट्यप्रयोग पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी होणार आहेत. याचे २४ प्रयोग होणार असून, नाट्यप्रयोगादरम्यान पालखीच्या ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. त्याचा पहिला प्रयोग श्री क्षेत्र देहू येथे होणार असल्याची घोषणा यावेळी केली.