दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : भारतवर्षामध्ये सध्या जे घडतंय, ते केले जात नसून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा सांगितले होते की, राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनीसुद्धा आपल्या स्वयंसेवकांना सांगितले होते की, हे ईश्वरीय कार्य आहे. ते करत रहा. ‘श्रद्धा, भक्ती आणि समर्पण हे भारतवर्षाचे सद्भाग्य आहे. त्यानुसारच आजही कार्य सुरू आहे. यातच त्या कार्याचे यश आहे. असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
आळंदीत स्वामी गोविंददेव गिरी यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित गीताभक्ती अमृत महोत्सवाचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी स्वामी गोविंददेव गिरी, जैन मुनी लोकेश महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचे मारुती महाराज कुऱ्हेकर, स्वामी राजेंद्रदास महाराज, बालयोगी सदानंद महाराज, अनुराग कृष्ण शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी लिहिलेल्या महाभारत या ग्रंथाचे प्रथम खंडाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अयोध्येत उभारलेल्या श्रीराम मंदिराच्या माध्यमातून भारतवर्षचे काम सुरू झाले आहे. हा संयोग नसून नियतीची योजना आहे. भगवंताची कृपा आहे, सतत प्रयत्न करणे आपले काम आहे. श्रद्धा, भक्ती, समर्पण हे सर्वसामान्यांमध्ये सतत राहणारे गुण आहेत. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज यांनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले आहे.
त्यामुळेच आमच्यापासून श्रद्धा, भक्ती, समर्पण विभक्त होऊ शकत नाही. कारण, कोणी झोपले तर त्याला जागवणारी ईश्वरी शक्ती आहे. त्या शक्तीची ईच्छाही अशी आहे की, कोणी राहो न राहो, भारतवर्ष रहायला हवे.”