अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट जखमी… — राष्ट्रीय महामार्ग 53… — मानेगाव सडक येथील घटना…

   चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

लाखनी :- मानेगाव जवळील आभास रेस्टॉरंट जवळच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 ला काळविटाची परिपक्व जोडी रस्ता ओलांडताना एका अज्ञात ट्रकने नर काळवीट धडक दिल्याने गंभीर जखमी झाले.त्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले.

          ही घटना 3 डिसेंबरला सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. अपघात घडल्यानंतर त्याचवेळी प्रवास करीत असलेले ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी तसेच मोठी पेंढरीचे पोलीस पाटील सेवकराम टिचकुले व खैरी येथील पोलिस पाटील प्रफुल्ल चौधरी यांनी लगेच वनविभागाचे वनक्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले यांना माहिती दिली.

          त्यांनी दूरध्वनीद्वारे बरडकिन्हीचे वनरक्षक सुधीर कुंभरे व गडेगावचे वनरक्षक राहुल लखवाड यांना माहिती देवून दोघांना तात्काळ घटनास्थळी पाठविले. क्षणाचाही विलंब न लावता दोघेही वनरक्षक घटनास्थळी पोहोचले व जखमी काळवीटाला पशूवैद्यकीय दवाखाना लाखनी येथे नेण्यात आले.उपचारानंतर त्याला वैद्यकीय अधिवासात सोडण्यात आले.यावेळी क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले, वनरक्षक राहुल लखवाड, सुधीर कुंभरे, सर्पमित्र मयूर गायधने व वनमजूर उपस्थित होते.

          भंडारा साकोली राष्ट्रीय मार्गावर यापूर्वीही अनेक वन्यप्राण्यांचा जीव गेला आहे.वनक्षेत्र आणि व्याघ्र प्रकल्प असलेल्या जिल्ह्यात वन्यप्राण्यावर उपचारासाठी एकही मदत केंद्र किंवा रेस्क्यु सेंटर नाही. त्यामुळे वारंवार होणाऱ्या अशा घटना लक्षात घेता अशा प्रकारचा रेस्क्यु केंद्र भंडारा जिल्ह्यात गडेगाव डेपो येथील वनविभागाच्या जागेत उभारावे अशी मागणी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने केली आहे.