श्रीगुरु हैबतबाबा पायरी पुजनाने उद्या समाधी सोहळ्याला प्रारंभ…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त मंगळवार दि.०५ रोजी श्री गुरु हैबतबाबा पायरी पुजनाने समाधी सोहळ्यास प्रारंभ होत आहे. कार्तिक शुद्ध अष्टमी मंगळवार दि.५ रोजी पहाटे ०३ ते ०५ वाजेपर्यंत संस्थान कमिटी तर्फे पवमान अभिषेक व दुधारी, सकाळी ०५ ते ११:३० पर्यंत चल पादुकांवर भाविकांच्या महापुजा संपन्न होईल.

            श्री गुरु हैबतबाबा वंशज प्रतिनिधी हभप बाळासाहेब पवार यांच्या तर्फे व विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात विधीवत श्रीगुरु हैबतबाबा पायरी पुजन सोहळा संपन्न होईल. दुपारी १२:३० वा. महानैवेद्य, सायं.६:३० ते ८ वाजता हभप योगिराज महाराज ठाकूर यांच्या तर्फे विणा मंडपात किर्तन सेवा होणार आहे.

          रात्री ८ वाजता धुपारती, रात्री ९ ते ११ हभप बाबासाहेब आजरेकर यांच्या तर्फे विणा मंडपात किर्तन सेवा होणार आहे. तसेच रात्री २० ते पहाटे ४ वाजेपर्यंत हभप वासकर महाराज, हभप मारुतीबुवा कराडकर व हभप हैबतबाबा आरफळकर यांच्या तर्फे जागर सेवा संपन्न होणार आहे. आळंदीत कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, आळंदी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.