रोशन कंबगौनिवार / प्रतिनिधि, राजाराम
राजाराम:- दिव्यांगाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असला तरी जिद्द, संयम आणि सहनशीलतेचे दर्शन दिव्यांग व्यक्तींमध्येच होते. त्यामुळेच समाजात सुदृढ व्यक्तींप्रमाणेच दिव्यांगांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.अहेरी येथे दिव्यांग कल्याण संस्था तर्फे आयोजित जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी तसेच दिव्यांग कल्याण संस्थेचे अध्यक्ष राकेश कारेंगुलवार, इल्यास शेख,प्रभाकर दब्बा,विनोद आऊतकर,राकेश मडावी,रामू मडावी आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.
पुढे बोलताना मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या सामाजिक घटकांच्या समस्या समजून घेण्यासाठी या दिवसाची निवड केली आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत.त्यामुळे दिव्यांग बांधव या विविध योजनांचा लाभ घेऊन समाजात सन्मानाने जगावे असे आवाहन करतानाच कुठलीही अडचण निर्माण झाल्यास आपण सदैव दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.तसेच योजनांचा लाभ घेताना अडचण निर्माण झाल्यास थेट संपर्क साधण्याचा आवाहनही त्यांनी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते केक कापून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.