बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
उजनी बॅक वॉटर वरती इंदापूर शहरासह गावो-गावच्या नळ पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. बॅकवॉटर वरील शेतकऱ्यांनी जमिनी देऊन मोठा त्याग केला आहे. त्यामुळे उजनी बॅकवॉटर साठी आगामी पावसाळ्या पर्यंत पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात यावा, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि.3) केली.
उजनी धरण कालवा सल्लागार समितीच्या ऑनलाईन बैठक सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या. हर्षवर्धन पाटील म्हणाले, सध्या उजनी धरणामध्ये आज रोजी 54.35 टक्के म्हणजे 92.80 टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. उजनी धरणाच्या 42 वर्षातील इतिहासामध्ये धरण हे 100 टक्के न भरण्याची ही नववी वेळ आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करून, काटकसरीने व जपून पाणी वापरावे. उजनी धरण बॅकवॉटरवरती पिण्याच्या पिण्याच्या अनेक नळ पाणी पुरवठा योजनांबरोबर, आगामी काळात उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होणे गरजेचे आहे, त्यासाठी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात पाणी आरक्षित ठेवण्यात यावे. या मागणीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना पाणी आरक्षित ठेवणे संदर्भात सकारात्मक सूचना दिल्या.
तसेच या बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी आगामी काळात उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील विद्युत पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, अशी मागणी केली. या मागणी वरही पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या बैठकीस आ.बबनदादा शिंदे, आ.संजय शिंदे, आ. सुभाष देशमुख, आ.समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी मान्यवर उपस्थित होते.