रमेश बामनकर
अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी :- निसर्गाने गडचिरोली जिल्ह्याला भरभरून निसर्ग सौंदर्य दिले.मात्र,जिल्ह्यातंर्गत अनेक सौंदर्य स्थळे व पर्यटन स्थळे दुर्लक्षित असून फक्त त्या त्या परिसरातील गावा पुरतेच मर्यादित असल्याचे दिसून येते आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्लक्षित स्थळा पैकी एक स्थळ म्हणजे गुड्डीगुडम परिसरातील डोंगर पायथ्याशी बारमाही वाहत असणारा जलकुंड झरा होय.
यालाच स्थानिक भाषेत एडजूगोंदी गुठ्ठा म्हणतात.याचा अर्थ एडजू-अस्वल,गोंदी-गुफा, गुठ्ठा-डोंगर असे होतो.
हे ठिकाण गुड्डीगुडम पासून दक्षिण दिशेला अवघ्या एक कि.मी.अंतरावर डोंगर पायथ्याशी असलेला बारमाही जलकुंड झरा आहे. त्या जलकुंडात बारमाही पाणी वाहत असते.जंगली प्राणी,पक्षी त्याच जलकुंडाच्या भरवशावर उन्हाळभर जीवन जगतात.
गुड्डीगुडम गाव डोंगर पायथ्याशी वसलेले असल्याने पूर्वीच्या काळात गावात पाण्याची टंचाई भासत होती.तेव्हा गावातील नागरिक याच जलकुंडाचे पाणी वापरत होते या संबंधीची आठवण आजचे वृद्ध करून देतात.
जलकुंडाच्या अवती भोवती हिरव्यागार वनस्पती,झाडे झुडपे असून पक्षाचे किलबिलाट नेहमी असते.या जलकुंडाची खोली काही वर्ष पाहिले जास्त होती.परंतु कालांतराने हळू हळू झऱ्याची खोली कमी होऊन पाणी वाहण्याची गती कमी झाली असे बोलले जात आहे.
या स्थळाकडे शासनाने लक्ष वेधून जलकुंड झऱ्याचे खोलीकरण केल्यास गुड्डीगुडम गावातील शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही.
असे बारमाही जलकुंड क्वचितच आढळतात.त्यामुळे असे वाटते की गडचिरोली जिल्ह्यातंर्गत निसर्गाच्या कुशीत वसलेले अनेक सौन्दर्य स्थळे व पर्यटन स्थळे दुर्लक्षित आहेत.