भिसी वनविभागातील अवैध वृक्षतोड प्रकरणातंर्गत वनपाल संतोष औतकार यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी… — माहिती देऊनही वृक्ष भरलेला ट्रक वनविभाग अधिकाऱ्यांनी जप्त केला नाही. — महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार तक्रार….

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

        चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या भिसी वनविभागातील मौजा पारडपार हद्दीत सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीकडे दुर्लक्ष केल्याच्या गंभीर आरोपांमुळे वनपाल संतोष औतकार यांच्यावर फौजदारी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. 

        वनविभागातील अधिकाऱ्यांना सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान माहिती देऊनही तस्करीसाठी वापरण्यात येणारा लाकडांनी भरलेला ट्रक २ मार्च रोज रविवारला पकडण्यात आलेला नाही,यामुळे संबंधित वन अधिकाऱ्यांचे अवैधपणे वृक्षतोड करणाऱ्या दलाला सोबत साटेलोटे व आर्थिक संबंध असल्याची दाट शंका आहे.

 

        मिळालेल्या माहितीनुसार, मौजा पारडपार हद्दी अंतर्गत नदी थडव्यावरील अवैध वृक्षतोड अनेक दिवसांपासून सुरू होती.

      तद्वतच सदर वृक्षतोड करणारा तस्कर हा मागिल दोन वर्षापासून भिसी वनविभागातंर्गत अवैध वृक्षतोड करीत असल्याचे बोलल्या जात आहे.

          अवैध वृक्षतोड सर्रास सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे कोणत्या कर्तव्यात मोडते हे नागरिकांसमोर यायला पाहिजे.

       विशेष म्हणजे,वनपाल संतोष औतकार यांना अवैध वृक्षतोड बाबत पुरेशी माहिती नव्हती असे म्हणता येत नाही.तथापि,त्यांनी अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याऐवजी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने वृक्षतोड करणाऱ्या तस्करांचे मागिल अनेक महिन्यांपासून फावले आहे..

        दिनांक २ मार्च च्या रात्रो १० वाजता मौजा पारडपार येथील चौधरी यांच्या शेतातून लाकुड भरलेला ट्रक वनविभागाच्या आशिर्वादाने नागपूरला हलविण्यात आल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.

*****

ट्रक पकडण्यास अपयश का?

       पर्यावरण कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मार्चच्या रात्री चिमूर तालुक्यातील मौजा पारडपार हद्दीतून मोठ्या प्रमाणावर किमती लाकूड एका ट्रकमध्ये भरले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वनविभागास कळवण्यात आले.

         मात्र,वनविभागाने कोणतीही तातडीची कारवाई केली नाही.परिणामी,लाकडांनी भरलेला ट्रक निर्भयपणे निघून गेला.स्थानिकांनी हा प्रकार वनविभागाच्या निष्क्रियतेचा जळफळाट करणारा पुरावा असल्याचे सांगितले आहे.

*****

वनपालांवर कारवाईची मागणी…

        या घटनेनंतर संतप्त पर्यावरण प्रेमींनी वनपाल संतोष औतकार यांच्यावर तातडीने फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

         वनसंरक्षणाच्या जबाबदारीवर असलेले अधिकारीच जर वृक्षतोड रोखण्यात अपयशी ठरत असतील,तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे,अशी भूमिका नागरिकांची आहे.

       काही नागरिकांनी या संदर्भात उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्याचा इशाराही दिला आहे.

*****

अवैध वृक्षतोडीमागे मोठा रॅकेट?

         सध्या भिसी वनविभागात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू असल्याच्या चर्चा आहेत.हा प्रकार वनमाफियांकडून संगनमताने होत असून,त्याला स्थानिक वनअधिकाऱ्यांचेही समर्थन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

        या प्रकरणात अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

*****

सरकारी पातळीवर चौकशी होणार?

       या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.जबाबदार नागरिकांनी वनमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देण्याचे ठरवले आहे. 

        तसेच,यामध्ये वनविभागातील इतर अधिकारीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

       भिसी वनविभागातील अवैध वृक्षतोड रोखण्यात वनपाल संतोष औतकार यांचे अपयश वर्तवले जात असून,त्यांच्या निष्क्रियतेमुळे तस्करांना मोकळे रान मिळाले आहे. 

       त्यामुळे,त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा या परिसरातील नागरिकांची आहे.

         तद्वतच वनपाल संतोष औतकार यांच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची चौकशी करण्याबरोबरच अवैध वृक्षतोड प्रकरणाची तक्रार दखल न्यूज भारत वेब पोर्टलचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके करणार आहेत…