कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे ग्रामायण – ज्ञानोदय हा नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेतील व गावातील विद्यार्थ्यांच्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी थाटात संपन्न झाला.
‘ शाळा गावाला भूषण – गाव शाळेला आधार ‘ या उक्तीची प्रचिती देणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा ही आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रसिद्ध असणारी वर्ग चौथीपर्यंतची एक शाळा आहे.
गरंडा हे छोटेसे गाव आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या सुद्धा जेमतेम अशाही परिस्थितीत भौतिक सुविधांची व मानवी संसाधनाच्या कमतरतेचा बाऊ न करता उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून शाळा आणि गावकरी यांच्या सहकार्याने अंगणवाडी, शाळा, आणि गावातील वर्ग ५ तर ८ मध्ये इतर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कला – गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भारतीय गणराज्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गणराज्य दिनाच्या पर्वावर ग्रामायाण – ज्ञानोदय हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मानव एकता मंच पारशिवनीचे संयोजक सामाजिक कार्यकर्ते डॉ.इरफान अहमद, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र (बापू) पाटील तरार, गट ग्राम पंचायत गवणा – गरंडा च्या सरपंच सोनाली धोटे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरिधर धोटे तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष अश्विनी गजभिये, ग्राम पंचायत सदस्य नितीन कोहळे, भारती मोरकुरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शारदा आपुरकर, गिरिधर क्षीरसागर, मारोती वाटकर, प्रीती कोहळे,पोलीस पाटील संदिप मेश्राम माजी सरपंच चुडामन ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी लेझिम, झेंडी कवायत, सूर्यनमस्कार, उभी व बसलेली कवायत, मानवी मनोरे, नाटक, कोळी नृत्य, देशभक्तीपर नृत्य, रिमिक्स, सामाजिक संदेश देणारे नृत्य, महापुरुषांचे गुणगान करणारे नृत्य सादर करण्यात आले.
हे कार्यक्रम साकार करण्यात गावातील काजल धोटे, सोनल गजभिये, सृष्टी क्षीरसागर , दामिनी निंबुळकर, कशिश गजभिये, आलिशा शेंडे, अंगणवाडी सेविका संघमित्रा शेंडे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी क्षीरसागर आणि शिक्षक ओंकार पाटील यांनी, प्रास्ताविक मुख्याध्यापक खुशाल कापसे यांनी तर उपस्थितांचे आभार ग्राम पंचायत कर्मचारी आनंद चव्हाण यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका संघमित्रा शेंडे, स्वयंपाकी प्रिया मेश्राम, राष्ट्रपाल मेश्राम, राष्ट्रपाल बोंबले, प्रशांत गजभिये, गेंदराज आपुरकर, गोलू वाघमारे शुद्धोधन मेश्राम यांनी सहकार्य केले.