अमरावती/प्रतिनिधी
स्थानिक बि.सि.हॉल राजापेठ,अमरावती येथे साने गुरुजी प्रणित आंतरभारती राष्ट्रीय ट्रस्ट च्या वतीने आंतरभारती स्नेह मिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आंतरभारती संघटना ही साने गुरुजींनी भारत हा बहुभाषिक देश असल्यामुळे काढली होती.भारतातल्या अनेक भाषा,विविध क्षेत्रातील बोलीभाषा आपणास समजत नाहीत किंवा त्या समजून घेण्यासाठी किंवा शिकण्यासाठी कोणतीही संस्था नाही आणि त्याबरोबरच प्रांतवाद हा भारताच्या विविधतेत एकतेच्या मार्गात प्रमुख अडथळा म्हणून समोर येत आहे,तो अडथळा दूर करण्यासाठी आंतरभारती संस्था सुरू केली.
आंतरभारती ही मानवतेच्या विरुद्ध निर्माण होणाऱ्या अडथळ्यांना दूर करून आपसापसामध्ये स्नेहवर्धन करणारे आंदोलन आहे.
आंतरभारती समाजवादी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि त्याबरोबरच हृदयाच्या वाणीवर विश्वास ठेवणारी संस्था आहे.
आंतरभारतीचे भारत दर्शन यात्रा आणि बाल आनंद महोत्सव हे महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहेत.याबरोबरच “भारत जोडो” या उपक्रमातून शिक्षक, तरुण-तरुणी,स्त्रिया यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम घेतले जातात.
अमरावती येथील मेळाव्यात सदाविजय आर्य राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार आंतरभारती शाखा सोलापूरचे अध्यक्ष सुभाष वर्धमान शास्त्री यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी ॲड.डी.एस्.कोरे, गोपाळ कोरडे,निवृत्त प्राचार्यराजा महाजन,संगीता देशमुख इ. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.आंतरभारती ट्रस्टचे कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी आंतरभारतीच्या कार्याची माहिती दिली.
तर आंतरभारती ट्रस्टच्या उपाध्यक्ष संगीता देशमुख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात प्रा.डाॅ.स्नेहाशिष दास यांना आंतरभारती स्नेहसंवर्धन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
साने गुरुजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त अमरावती येथे आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात हे दोन्हीही पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गौरव इंगळे यांनी केले.आंतरभारती शाखा सोलापूरचे कार्यवाह अरुणकुमार धुमाळ यांच्यासह वसमत,आंबेजोगाई, औरंगाबाद, गोवा, विदर्भ, मराठवाडा इ. ठिकाणचे कार्यकर्ते या स्नेहमिलन मेळाव्यास उपस्थित होते.
अध्यक्ष म्हणून आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब हे होते.
माजी सचिव राजा महाजन,राष्ट्रीय सचिव डॉ.डी.एस.कोरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ.पंजाबराव देशमुख,पूज्य सानेगुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
‘खरा तो एकची धर्म’ सानेगुरुजींची प्रार्थना सर्वांनी म्हटली.सर्व मान्यवरांचे स्वागत भाऊसाहेब उपाख्य डॉ.पंजाबराव देशमुख यांचे जीवन चरित्र ग्रंथभेट देऊन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रा.शांताराम चव्हाण यांनी केले.याप्रसंगी डॉ.डी. एस.कोरे यांनी गोपाळराव कोरडे,यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
आंतरभारतीचा कार्यकर्ता पुरस्कार डॉ.सुभाष शास्त्री ज्यांनी आजवर आंतरभारतीचे मासिकपत्रिकेचे काम अविरतपणे चालवले त्यांना स्नेहमिलनचा कार्यकर्ता पुरस्कार देऊन या प्रसंगी त्यांना सन्मानीत करण्यात आले.तसेच अमरावती आंतरभारती तर्फे संगीत क्षेत्रातील डॉ.स्नेहाशीष दास यांना सन्मानीत करण्यात आले.तसेच उदगीर समूहातून कांता कलबुर्गे यांना उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून सन्मानित करण्यात आले.सत्काराला उत्तर म्हणून डॉ.सुभाष शास्त्री यांनी मनोगत व्यक्त करत पुढील वर्षीचा आंतरभारती स्नेह मिलन मेळावा सोलापूरला घेण्याचे आश्वासन दिले.संगीत क्षेत्रातील महत्वाचे योगदान देणारे डॉ.स्नेहाशीष दास यांनी सत्काराला उत्तर देत गीत सादर केले.
दोन्ही सत्कारमूर्तींनी आंतरभारती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.या सोबतच आंतरभारतीने राष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधीवर आधारित घेतलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण केले.यात संभाजीनगर येथील प्रथम क्रमांक प्राप्त शीतल राजपूत ही स्वतः उपस्थित होती.
अध्यक्षीय समारोप आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी केला.आभार श्री विठ्ठलराव ठाकरे यांनी मानले. गौरव इंगळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे,”आगे चल नवजवान आगे चल,हे गीत गाऊन सुंदर आणि ओघवत्या शब्दात सूत्रसंचालन केले. भोजनानंतर नियोजित वेळेवर दुसरे सत्र सुरु झाले.
अमरावतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार प्राप्त डॉ.देवाशीष दास यांनी संगीतातील रागाची ओळख या विषयावर आधारित सुंदर असा खेळ घेतला.
या खेळाचा सर्व उपस्थित सदस्यांनी आनंद घेतला.भाऊसाहेब उपाख्य डॉ.भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त प्रा.डॉ.महेंद्र मेटे यांनी भाऊसाहेबांबद्दल अत्यंत महत्वाची माहिती सांगत त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.संत गाडगेबाबा यांच्या जीवन व कार्याची ओळख डॉ.संदिप राऊत यांनी करुन दिली.
शेवटी शेतकरी नेते विजयभाऊ विल्हेकर यांनी संत गाडगेबाबा यांचे,”गोपाला-गोपाला देवकीनंदन गोपाला,हे गीत आणि इतर सुंदर गिते गायली.
कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची “तनमन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा,विजयी हो,विजयी हो,विजयी हो,भारत देश हमारा” या राष्ट्रवंदनेने कार्यक्रम संपन्न झाला.
सर्व सहभागी सदस्यांना व उपस्थितांना प्रमाणपत्र दिले.अमरावती टिममधील डॉ.शांताराम चव्हाण,डॉ.भारत कल्याणकर,प्रवीण पवित्रकार,प्रा. सुधाकर गौरखडे,पंकज महाजन, डॉ.प्रवीण सदार डॉ. मनोज सपकाळ, प्रदीप पाटील, पियुष चव्हाण, आकाश देशमुख यांच्यासह सर्वच टीमने अत्यंत मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.