दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : श्रीक्षेत्र आळंदी-देहूच्या कुशीतून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीला वारकऱ्यांच्या मनात अतिशय पवित्र स्थान आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत इंद्रायणीचे प्रदूषण चिंतेचा मुद्दा झाला आहे. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थाकडे वाटचाल होत असताना ‘स्वच्छ, निर्मळ इंद्रायणी’ संकल्पनाही प्रत्यक्षात येणे आवश्यक आहे त्याच अनुषंगाने आळंदी शहर पत्रकार संघ, इंद्रायणी नदी काठी असलेल्या सर्व सामाजिक संस्था, आळंदीकर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी संत संगम भेटी द्वारे श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र आळंदी अशी सायकल रॅलीचे भव्य आयोजन रविवार दि. ८ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता आळंदी येथुन करण्यात येणार आहे असे आयोजक ॲड.विलास काटे व विठ्ठल शिंदे यांनी सांगितले आहे.
इंद्रायणी नदीत स्नान करणे म्हणजे मानवी देहाला पवित्र करून घेणे होय, अशी वारकरी भाविकांची भावना आहे. मात्र, आजमितीस इंद्रायणी नदी फक्त कागदावर पवित्र नदी राहिली आहे. या नदीच्या उगमापासून संगमापर्यंत प्रदूषणाचा विळखा पडला आहे. केवळ नदीच नव्हे, तर काठावर आणि त्या लगतचा परिसर दुर्गंधीने व्यापलेला आहे. त्यामुळे नदीला नदी म्हणायची की नाला हेच समजत नाही. प्रदूषण थांबविण्यासाठी संत संगम भेट भव्य सायकल रॅली काढण्यात येणार आहे यात इंद्रायणी नदी बचाव संवर्धनासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे इंद्रायणी काठी असलेल्या गावात जाऊन इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होणे ही काळाची गरज आहे यासाठी प्रबोधन केले जाणार आहे तरी या सायकल रॅलीचा शुभारंभ आळंदी येथील पवित्र भागिरथी कुंड येथुन भगवा झेंडा दाखवून केला जाणार आहे, ही सायकल रॅली आळंदी येथून देहू फाटा, डुडूळगाव, हवालदार वस्ती, मोशी, कुदळवाडी, चिखली, तळवडे, विठ्ठल वाडी मार्गे देहू पोहचेल येथील इंद्रायणी काठी इंद्रायणी पुजन करण्यात येईल,संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सायकल रॅली चे देहू वरुन तळवडे, मोई, चिंबळी, केळगाव,आळंदी प्रदक्षिणा पूर्ण करुन इंद्रायणी काठी इंद्रायणी मातेची आरती होऊन सायकल रॅलीचा समारोप केला जाणार आहे तरी अधिकाधिक सायकल स्वारांनी इंद्रायणी बचाव संवर्धनासाठी सायकल रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक ॲड.विलास काटे व विठ्ठल शिंदे यांनी केले आहे.