प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मौजा गदगाव येथील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या अतिक्रमण जागेवरील धम्मध्वज व तथागत भगवान गौतम बुद्धांची मुर्ती जप्त करुन सदर जागा आपल्या ताब्यात आज घेतली.
तथागत भगवान गौतम बुद्धांनी भारतासह जगातील सर्व नागरिकांना चारित्र्य संपन्नतेचा,सर्व विकार मुक्तीचा, शांतीसह करुणेचा आणि समता,बंधुता,स्वातंत्र्यता आणि समान न्यायाचा आपल्या अभुतपुर्व सखोल अनुभुती अंतर्गत बोधी द्वारे संदेश दिलाय.
अख्ये जग तथागत भगवान गौतम बुद्धांचा देश म्हणून भारताकडे आस्थेने,आदराने,आणि मानसन्मानाने बघतो आहे.त्याच भारत देशात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मुर्तीला व त्यांच्या धम्म ध्वजाला जागा मिळत नाही.हे वास्तव्यच भारतातील विषमतावादी व्यवस्थेच्या जहाल घटनाक्रमांचे दुःखद् वर्णन वर्षानुवर्षे करते आहे,हे चंद्रपूर जिल्हांतंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा गदगाव येथील आजच्या घटनाक्रमावरुन प्रखरतेने जाणवते आहे.
तद्वतच ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातील तमाम ओबीसी,एसी,एसटी,अल्पसंख्याक,व्हिजेंटी-एन्टी आणि इतर नागरिकांना मानुष्किने व मानसन्मानाने जगण्याचा अधिकार दिला,मताचा महत्त्वपूर्ण अधिकार दिला,समता-बंधुत्व-न्याय- स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार दिला,बोलण्याचा-लिहिन्याचा-धनसंचय करण्याचा अधिकार दिला,मोफत उपचार करण्याचा अधिकार दिला,स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार दिला,विनामुल्य शिक्षण घेण्याचा अधिकार दिला,खासदार-आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी होण्याचा अधिकार दिला,अधिकारी व कर्मचारी होण्याचा अधिकार दिला,देशात कुठेही राहण्याचा अधिकार दिला,अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार जगन्याचा अधिकार दिला,व्यापार करण्याचा अधिकार दिला,स्वतःचे व इतरांचे रक्षण करण्याचा अधिकार दिला,उन्नती करण्याचा अधिकार दिला,त्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष भारत देशातील बहुसंख्य समाजाचे नागरिक स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर सुध्दा करतात याला काय म्हणावे?
ज्यांच्या कायद्याच्या बलावर भारत देशातील शासन-प्रशासन आहे,तेच शासन-प्रशासन तथागत भगवान गौतम बुद्धांना आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्यास कमी पडले आहे.म्हणूनच भारत देशातील नागरिक अजूनही जातिभेदाच्या गर्तेत अडकून भेदभाव आणि द्वेष करतांना दिसतात हे ताजेतवाने उदाहरण म्हणजे चिमूर तालुक्यातील मौजा गदगाव येथील,”तथागत भगवान गौतम बुद्धांची मुर्ती व धम्म ध्वज हटविण्याचे प्रकरण होय!..
प्राचीन व मध्ययुगीन इतिहास बघता भारत देशातील अख्खी भुमीच तथागत भगवान गौतम बुद्धांची आहे व वर्तमान काळ बघता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आहे.ज्यांनी त्या भुमीचे रक्षण व संरक्षण करण्याचे अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातून शासन प्रशासनाला दिले आहे.
जगातील प्रथम महाज्ञानी म्हणून ज्यांना संबोधल जातय त्या तथागत भगवान गौतम बुद्धांची,”त्यांच्याच भारत भुमीत, मुर्ती बसवायला आणि धम्म ध्वज काढायला जागा मिळू नये.तद्वतच त्यांच्या महान तत्त्वज्ञानाला अनुसरून कार्यक्रम करायला जागा मिळू नये.
याचबरोबर जगात चौथ्या क्रमांकावर महाज्ञानी म्हणून ज्यांना संबोधल जातय आणि जगप्रसिद्ध लोक उध्दारक म्हणून ज्यांना जगाने मान्यता दिली,ज्यांनी आपल्या महान कार्याद्वारे भारताची मान मानसन्मानाने जगात उंचावली त्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय नागरिकांद्वारे त्यांच्याच भुमित पदोपदी अपमान व्हावा,यासारखी लाजिरवाणी व दुःखद् घटना असू शकत नाही.
तथागत भगवान गौतम बुद्धांबाबत व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत अपमानास्पद अयोग्य घटना भारत देशात वारंवार घडत असताना,”केंद्र सरकार व देशातील राज्य सरकारे याबाबत उत्तम व निर्णायक भुमिका घेत नाही,या त्यांच्या वागण्याला काय म्हणावे?
भारत देशातंर्गत महाराष्ट्र राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्यांतर्गत चंद्रपूर जिल्हा आहे.चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुका आहे आणि तालुका अंतर्गत मौजा गदगाव आहे.
या गावातील बौद्ध बांधवांनी तथागत भगवान गौतम बुद्धांची मुर्ती बसविण्यासाठी व धम्म ध्वज उभारण्यासाठी आणि सामाजिक उत्तरदायित्वान्वये सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी कार्यक्रम घेण्याच्या हेतूने मालकी हक्काची जागा मिळावी म्हणून उपविभागीय अधिकारी चिमूर व तहसीलदार चिमूर यांना सन २०२३ ला अर्ज दिलेत.
मात्र उपविभागीय अधिकारी चिमूर व तहसीलदार चिमूर यांनी गदगाव येथील बौद्ध बांधवांच्या अर्जाकडे अजिबात लक्ष दिले नाही.याचा अर्थ असा की त्यांनी सदर अर्जाला कायदेशीर मार्गाने व सनदशीर मार्गाने कारवाईसाठी महत्व दिले नाही.
मात्र,तथागत भगवान गौतम बुद्धांची मुर्ती व धम्म ध्वज हटविण्याचे संबंधाने मौजा गदगाव येथील विरोधकांचे अर्ज येताच त्या अर्जांना अनुसरून तथागत भगवान गौतम बुद्धांची मुर्ती व धम्म ध्वज हटविण्याची कारवाई आज सकाळीच केली जातय.या संबंधातील कारवाई बाबतचा तहसीलदार श्रिधर राजमाने यांचा कुठला कर्तव्य भाग समजायचा? हे ते सोयीस्करपणे सांगणार की कायदेशीरपणे सांगणार याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ बघेलच!
मौजा गदगाव प्रकरण अधिवक्ता इनामुल हक्क यांनी नागपूर खंडपीठात पिआयएल (सार्वजनिक हित याचिका) द्वारे न्यायप्रविष्ट केले आहे.त्यावर काल प्रथम दर्शनी औपचारिक सुनावणी झाली असल्याचे कळले.मौजा गदगाव प्रकरण हे आता न्यायप्रविष्ट झाले असल्याने या प्रकरणाला आता वेळ लागणार आहे.
सार्वजनिक हित याचिका ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे जी नागरिक आणि संस्थांना सार्वजनिक चिंतेच्या बाबींचे निराकरण करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याची परवानगी देते.
तद्वतच सार्वजनिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी,सामान्य कल्याणाला चालणा देण्यासाठी आणि न्यायालयात जाण्यासाठी असमर्थ असलेल्या लोकांच्या हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली जातय.
मौजा गदगाव प्रकरणातंर्गत निकाल कोणत्याही बाजूने याला तरी त्याचा गंभीर आणि विचारभेदी परिणाम तेथील स्थानिक नागरिकांवर नक्कीच पडणार आहे.
यामुळे हेच प्रकरण उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे आणि तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी औपचारिक रित्या हाताळले असते तर ते न्यायसंगत असते हे आवर्जून स्पष्ट आहे.
मौजा गदगावात,इतर सर्व समाज बांधवांचे अतिक्रमण जागेवरच देवळे व श्रध्दास्थाने आहेत.सदर श्रध्दा स्थानाला तेथील बौद्ध बांधवांनी विरोध केला नाही.मग अतिक्रमण जागेवरील बौद्ध श्रध्दास्थानालाच विरोध का म्हणून?याचे उत्तर त्या गावातील इतर नागरिक व संबंधित अधिकारी समजदार पुर्वक देणार काय?
मौजा गदगावात आज दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोज मंगळवारला तथागत भगवान गौतम बुद्धांची मुर्ती व धम्म ध्वज पोलिस संरक्षणात हटविण्याचा घडलेला घटनाक्रम कायदेशीर वाटत असला तरी या प्रकरणाचे गांभीर्य राजकीय दबावतंत्रातले दिसून येते आहे व अनैसर्गिक कृतीतले असल्याचा दुर्गंधही दरवळतो आहे.
अन्यथा इतर श्रध्दास्थाने अतिक्रमण जागेवरुन हटविण्याची कारवाई सुध्दा उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे व तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी केली असती!..
यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धांची मुर्ती व धम्म ध्वज हटविण्याबाबतची तहसीलदार श्रिधर राजमाने यांची कारवाई पक्षपाती की कायदेशीर हे पुढे चालून समोर येईलच!
पण,स्वतःच्या संस्कृतीचे व विचारांचे जतन करण्याचा बौद्ध समाज बांधवांचा अधिकार भारतीय शासन व प्रशासन आपल्या अधिकारात वारंवार नाकरते आहे,हा अन्यायच नाही का?