आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्याने ५ डिसेंबरला आळंदी बंदची हाक… 

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तपदी नुकतेच तीन विश्वस्तांची नेमणुक जिल्हा न्यायाधीश यांनी जाहीर केली. यामध्ये तत्कालीन तीन विश्वस्तांच्या शिफारशीमुळे नवीन तीन विश्वस्तांची नेमणुक करण्यात आली असल्याने यामध्ये आळंदीतील स्थानिकांना हेतु परस्पर डावलण्यात आल्याने आळंदी ग्रामस्थांनमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्याच अनुषंगाने आळंदी ग्रामस्थांच्या वतीने या प्रक्रियेचा निषेध म्हणून मंगळवार दि.५ डिसेंबर रोजी आळंदी बंद पुकारण्यात आला आहे.

         याबाबत समस्त आळंदीकर ग्रामस्थांची रविवार दि.३ डिसेंबर रोजी ज्ञानदर्शन धर्मशाळेत बैठक बोलवण्यात आली. आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांची निवड करण्यात यावी यासाठी संबंधित प्रशासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला होता. तरी देखील संबंधित प्रशासनाने स्थानिकांचा विचार न करता आळंदी देवस्थानवर तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशी वर नवीन तीन विश्वस्तांची नेमणुक केली आहे. तसेच तत्कालीन विश्वस्तांना सुध्दा मार्च महिन्यापर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. याबाबत समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने या गोष्टीचा तीव्र निषेध करण्यात आला असून प्रशासनाने याकडे योग्य लक्ष न दिल्यास कार्तिकी वारीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आळंदी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

           यावेळी बबनराव कुऱ्हाडे, डि.डि.भोसले, चैतन्य महाराज लोंढे, सुरेश वडगावकर, रोहीदास तापकीर, राहुल चिताळकर, नंदकुमार कुऱ्हाडे, रामदास भोसले, रमेश गोगावले, अशोक रंधवे, आनंदराव मुंगसे, शंकर कुऱ्हाडे, अशोक उमरगेकर, संजय घुंडरे, सचिन गिलबिले, किरण येळवंडे, विलास कुऱ्हाडे, शिरीषकुमार कारेकर, विठ्ठल घुंडरे, संजय वडगावकर, संकेत वाघमारे, महेश जाधव, सुनिल रानवडे, श्रीधर घुंडरे, राहुल चव्हाण, सुरेश घुंडरे तसेच आळंदीकर ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.