अभ्यासिकेत तयारी करून दिपेंद्र झाला राज्यकर निरीक्षक… — खा. सुनिल मेंढे यांनी केले कौतुक…

प्रितम जनबंधु

    संपादक

            भंडारा:- होतकरू आणि परिश्रम घेण्याची तयारी असलेल्या विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी चांगली जागा उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या स्व. बाबुराव मेंढे स्मृती प्रतिष्ठानच्या अभ्यासिकेतून अनेकांनी शासकीय नोकरीचा मार्ग लाभला असून नुकतीच एका तरुणाची राज्य शासनाच्या वस्तू व सेवा विभागात राज्यकर निरीक्षक पदावर वर्णी लागली आहे.

              अभ्यासिकेत अभ्यास करून शासकीय नोकरीत रुजू झालेल्या दिपेंद्र खांडेकर यांचे आज खासदार सुनील मेंढे यांनी कौतुक केले.

            स्वर्गीय बाबुराव मेंढे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने विविध लोकहिताचे आणि कल्याणकारी उपक्रम हाती घेण्यात आले आहे.

                 परिश्रम घेऊन मोठे होण्याची जिद्द असलेल्या तरुण-तरुणींसाठी केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी म्हणून वाचनालय आणि अभ्यासिका या प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आली. भंडारा येथे पहिली अभ्यासिका उभारण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील आणखी तीन तालुक्यांमध्ये ही अभ्यासिका सुरू केली गेली आहे.

             अभ्यासिकेत अभ्यास करून अनेक तरुण-तरुणी यशस्वी झाले आहेत. शासकीय आणि खाजगी सेवेत त्यांना संधी मिळालेली आहे. नुकत्याच याच अभ्यासिकेतून तयार झालेल्या म्हाडा कॉलनी येथील दिपेंद्र जगदीश खांडेकर या तरुणांनीही यशाला गवसणी घातली आहे. राज्य शासनाच्या वस्तू व सेवा विभागाच्या राज्य कर निरीक्षक पदावर त्याची वर्णी लागली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून त्याने हे यश मिळविले आहे. या यशस्वी तरुणाचे कौतुक आज खासदार सुनील मेंढे व त्यांच्या सौभाग्यवती तथा प्रतिष्ठानच्या प्रमुख शुभांगी मेंढे यांनी केले. दिपेंद्र याला पुष्पगुच्छ देत त्याचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

              वाचनालयातील वातावरण आणि त्यामुळे सोपी झालेली परीक्षेची तयारी याचा या यशात मोलाचा वाटा असल्याचे दिपेंद्र यांनी यावेळी सांगितले.