दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे लोकशाही विरोधी असून देशाच्या चारित्र्याला धोका निर्माण झाला आहे, लोकशाहीचा सौदा मांडणे सुरु आहे, या अंधार युगात लोकशाही निकोप राहण्यासाठी गांधी विचार महत्वाचा आहे’,असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी ‘आज गांधी जिवंत असते तर…’ या विषयावरील व्याख्यानात पुण्यात केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह निमित्त ३ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजता गांधी भवन, कोथरूड येथे हे व्याख्यान झाले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे विश्वस्त डॉ.शिवाजीराव कदम, तसेच डॉ.लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन, जांबुवंत मनोहर, डॉ.उर्मिला सप्तर्षी, संदिप बर्वे, नीलम पंडित, सुदर्शन चखाले , मुकुंद बहाळकर आदि सभागृहात उपस्थित होते. प्रारंभी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
डॉ.सबनीस म्हणाले, ‘गांधीवाद नवीन तरुणाईच्या हातात पुढे जात आहे, हे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे योगदान महत्वाचे आहे. धर्मांध हिंदुत्व हे धर्मांध इस्लामवादाला प्रमाण मानणारे आहे. हे अंधार युग आहे. त्यात गांधी विचार घेवून पुढे गेले पाहिजे. समकालीन धर्म वेत्त्यांमध्ये, धुरीणांमध्ये गांधींना मानले जात होते. गांधींजींच्या विचारांना सर्वांनी मान्यता दिली आहे. गांधीजींच्या काळात राजकारण सात्विक होते. मतभेद म्हणजे शत्रुत्व, विरोधकांना संपवणारे राजकारण आज सुरु आहे.गांधींचा विचार सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा विचार करणारा आहे, हे समाज मनावर बिंबवले पाहिजे, असेही ते म्हणाले. महात्मा गांधी हे खरे विश्व नेते आहेत. भारताच्या सीमा ओलांडून त्यांचे विचार पोचले. आज गांधी असते तर यंत्रणांचा गैर वापर झाला नसता. कायद्याची बूज राहिली असती. लोकशाही निकोप राहिली असती, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’ गांधी विचारांच्या संस्था संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे.सत्तेवरून जाताना देशातील चांगले गुण, स्वास्थ, उद्योग नष्ट करणे हा मोदींचा प्रयत्न आहे.आज सत्य बोलणे, विवेकनिष्ठ राहणे आवश्यक आहे. निर्भय पणाने प्रश्न विचारत राहिले पाहिजे. आपण हुकूमशाहीला विरोध करीत राहिले पाहिजे.