हॉकीच्या जादूगारा स्मरणार्थ ग्रामगीता महाविद्यालयात करण्यात आले राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :- संपूर्ण जगामध्ये आपल्या हॉकीच्या स्टिकद्वारे सर्वांना चकित करून आपल्या भारताचे नाव हॉकीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवणारे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

            या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयात विविध क्रीडा संबंधी प्रश्नमंजुषा तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने तसेच उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

           आपल्या जीवनात खेळांचे किती महत्त्व असते आणि त्यांचा आपल्या आरोग्यावर तसेच आपल्या सर्वांगीण विकासावर काय परिणाम होतो याची माहिती विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आली.

           कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हुमेश्वर आनंदे तसेच प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून आय. क्यू . ए. सी. कोऑर्डिनेटर डॉ. निलेश ठवकर आणि प्राध्यापक डॉ. मृणाल वराडे म्हणून लाभले तर कार्यक्रमाचे आयोजन शारीरिक शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संदीप सातव यांनी केले.

           कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथींनी आपल्या जीवनात शारीरिक शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. महाविद्यालयात, विद्यापीठ स्तरावर तसेच राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धा याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना त्यांनी दिली तसेच एक खेळाडू म्हणून त्यांना शासकीय नोकरीमध्ये मिळणारे लाभ सुद्धा पटवून दिले.

           कार्यक्रमाप्रसंगी आभार प्रदर्शन प्राध्यापक समीर भेलावे यांनी केले. कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.