दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :- शहरातील बेशिस्त वाहन पार्कींगला आता चाप बसणार आहे. आळंदी शहरांमध्ये दररोज वाढणारी भाविकांची गर्दी, वाढणारी वाहनांची संख्या, अपुरे रस्ते, तसेच रस्त्यावर पार्क होणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस होणारा अडथळा यामुळे आळंदी शहरात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. आज पासून पोलीस ठाणे आळंदी कडून प्रदक्षिणा मार्ग व मुख्य रस्त्यांवर बेशिस्तपणे पार्क करणाऱ्या वाहनांना जामर लावण्याची कारवाई सुरू केली आहे.
आळंदी शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून वाहनधारक रस्त्यावर कुठेही वाहन लावून वाहतूकीस अडथळा निर्माण करतात. अशा बेशिस्त पार्कींगमुळे अनेक वेळेस वाहतूक कोंडी होवून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा वाहनधारकांना शिस्त लागावी.
तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी वाहनांना जामर लावण्याची कारवाई सुरू केली आहे अशी माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस.नरके यांनी दिली आहे. त्यासाठी सर्वांना आवाहन आहे की, सर्व भाविक व आळंदी ग्रामस्थ यांनी रस्त्यावर वाहन पार्क करू नये. चाकण चौकातील नगरपालिकेच्या पार्किंग ठिकाणी वाहन पार्क करावे. तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस प्रशासनाशी कोणीही वाद न घालता सहकार्य करावे. असे आव्हान पोलिस प्रशासनाने केले आहे.