चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधि भंडारा
नवजीवन विद्यालयाने या वर्षी शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या दरम्यान विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे दि .२२ जुलै २०२४ ते २८ जुलै २०२४ ला आयोजन करण्यात आले होते. आठवडाभर चाललेल्या या उपक्रमांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
पहिला दिवस :- अध्ययन अध्यापन साहित्य शिक्षण सप्ताहाची सुरुवात अध्ययन अध्यापन साहित्य दिनाने झाली. या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध अध्ययन साहित्यांचे प्रदर्शन लावले. पुस्तके, शैक्षणिक साधने, आणि शैक्षणिक खेळांचे महत्त्व याबद्दल माहिती दिली गेली.
दुसरा दिवस :- मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस या दिवशी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी संख्याज्ञान आणि साक्षरतेवर आधारित विविध खेळ आणि उपक्रमांमध्ये भाग घेतला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणित आणि वाचनाचे महत्व पटवून दिले.
तिसरा दिवस :- क्रीडा दिवस क्रीडा दिवसाच्या निमित्ताने विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कबड्डी, खो-खो, क्रिकेट, आणि धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या शारीरिक कौशल्याचे प्रदर्शन केले.
चौथा दिवस :- सांस्कृतिक दिवस सांस्कृतिक दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणे, नाटक, आणि लोककला सादर केली. या कार्यक्रमाने शाळेतील वातावरण रंगमय झाले आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.
पाचवा दिवस :- कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आणि डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प सादर केले. ३ डी पेंट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वर्गाचा नकाशा तयार करणे आणि 3D प्रिंटिंग यासारख्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डिजिटल साक्षरतेचे महत्व पटवून दिले.
सहावा दिवस :- इको क्लब व शालेय पोषण दिवस इको क्लब दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले. वृक्षारोपण, आणि स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. शालेय पोषण दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्व पटवून दिले गेले आणि पोषण आहाराचे नमुने सादर करण्यात आले.
सातवा दिवस :- समुदाय दिवस समुदाय दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थी, पालक, आणि शिक्षकांनी एकत्र येऊन विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले. यामध्ये तिथी भोजन, स्वच्छता अभियान अशा उपक्रमांचा समावेश होता.
शिक्षण सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक डॉ. लोकानंद नवखरे व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी योगदान दिले.