दखल न्युज भारत
चिखलदरा तालुका प्रतिनिधी
अबोदनगो चव्हाण
चिखलदरा दि. 2 : मेळघाटात कुपोषण निर्मलूनाबरोबरच सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षण, कृषी, आरोग्य, पाणीपुरवठा, उद्योगव्यवसाय, पायाभूत सुविधा आदीसंबंधी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. अधिका-यांनी नियमितपणे मेळघाटातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून त्या दूर करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.
आदिवासी भागातील बालमृत्यू टाळण्यासाठी गाभा समिती व ‘मिशन मेळघाट’ची आढावा बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी विजय भाकरे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, उपायुक्त संजय पवार, राजीव फडके हे विभागीय आयुक्त कार्यालयात, तर सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह विविध अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत. त्यासाठी आरोग्य सेवेचा दर्जा उंचावतानाच तेथील सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्व विभागांच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिका-यांनी वेळोवेळी नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून त्या दूर कराव्यात. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून योजना राबविणे आवश्यक आहे.
येता पावसाळा लक्षात घेता सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश डॉ. पाण्डेय यांनी दिले. त्या म्हणाल्या, पावसाळ्यात संपर्क तुटणा-या गावांमध्ये धान्य व आवश्यक वस्तूंची, तसेच पुरेसा औषधसाठा आदी तजवीज ठेवावी. प्रदूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक व्यवस्था करावी. जुने रस्ते, पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. आवश्यक दुरुस्ती करुन घ्यावी व कार्यवाहीचा अहवाल पंधरा दिवसांत द्यावा. नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित व वित्तीय हानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
शासकीय योजना, सुविधा व सेवांच्या अधिक परिणामकारकतेसाठी विविध विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मेळघाटसाठी धारणी येथील उपविभागीय अधिका-यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम करावे व मेळघाटातील विविध विभागांच्या कामांचा नियमितपणे घ्यावा, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.
मेळघाटसाठी समग्र विकास आराखडा तयार करणार
अधिका-यांनी नागरिकांमध्ये स्वत: मिसळून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. त्यासाठी मेळघाटातील गावांमध्ये विविध विभागाच्या अधिका-यांनी स्वत: मुक्काम करून नागरिकांचे म्हणणे समजून घ्यावे. तेथील शेती, गावपातळीवरील सुविधा, अडचणी, आवश्यक सुधारणा यांची माहिती घ्यावी. या भेटीत प्राप्त सूचना, मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी सर्व विभागांच्या अधिका-यांची बैठक चिखलदरा येथे लवकरच घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. भाकरे यांनी सांगितले. मेळघाटातील गावांमध्ये भेटी देणा-या अधिका-यांना तेथील आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आदी आवश्यक सुविधांबाबतचा एक प्रोफार्मा तयार करून देण्यात येईल. त्यानुसार प्राप्त माहितीवर समग्र विकास आराखडा तयार करण्यात येईल, असे श्री. भाकरे यांनी सांगितले.
जिल्हास्तरावर विविध विभागांमध्ये नियुक्त जिल्हास्तरीय अधिका-यांनी दर पंधरवड्यातून एकदा मेळघाटात भेट द्यावी व विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांच्या अपेक्षा जाणून त्यानुसार कार्यवाही करावी, असे आवाहनही करण्यात आले.