
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चंद्रपूर, दि. 3 : चंद्रपूर जिल्ह्यासाठी दहा नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या असून,एसटी महामंडळाच्या सेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.
या नव्या बसेस केवळ वाहने नसून,जनतेच्या विश्वासाचं,संवादाचं आणि सेवाभावाचं प्रतीक आहेत.प्रत्येकाचा प्रवास अधिक सोयीचा,सुरक्षित आणि सुसज्ज व्हावा,जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.
चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील जिल्ह्यांपैकी एक असून,एसटी ही गरीब आणि मध्यमवर्गीयांची जीवनदायिनी असल्याचे मत राज्याचे माजी वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर बसस्थानक येथे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागातर्फे मंजूर झालेल्या दहा नव्या बसेसपैकी पहिल्या टप्प्यातील 5 बसेसला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले,याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी चंद्रपूरच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक अधिकारी पुरुषोत्तम व्यवहारे,आगार व्यवस्थापक अंकुश खाडिलकर,विभागीय अभियंता (स्थापत्य) ऋषिकेश होले,बसस्थानक प्रमुख हेमंत गोवर्धन,कार्यशाळा अधीक्षक मनोज डोंगरकर,वाहतूक निरीक्षक अंकित कामतवार,सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रकाश तोडकर,बंडू गौरकार आदी उपस्थित होते.
आमदार श्री.सुधीर मुनगंटीवार म्हणाले,मी अर्थमंत्री असताना एसटी महामंडळाला सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला होता.याचे कारण म्हणजे श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या वाहनाने प्रवास करू शकतो,परंतु गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी एसटी हा प्रवासाचा आधार आहे.सर्वांच्या सुखदुःखामध्ये एसटी महामंडळाने साथ दिली आहे.
चंद्रपूर,बल्लारपूर आणि मुल या बस स्थानकांसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला.
परिवहन मंत्र्यांनी निधी न मागता देखील 700 नवीन बस खरेदीसाठी निधी दिला.
त्याचबरोबर ठाणे,कल्याण-डोंबिवली आणि मुंबईतील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ‘तेजस्विनी’ वातानुकूलित बसेस उपलब्ध करून दिल्यात.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 200 नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या होत्या,त्यापैकी 100 बसेस जिल्ह्याला मिळाल्या असून उर्वरित 100 बसेस लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे चंद्रपूर जिल्ह्याला भेट देणार असून,येथील वाहन चालकांची पदे,त्यांच्या निवास व्यवस्थेबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल.
मुल येथे बस डेपो उभारण्यासाठी जागा निश्चित झाली असून,त्याच्या उभारणीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
यासंबंधी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लवकरच चंद्रपूर दौऱ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
एसटी महामंडळाची सेवा अधिक सक्षम व कार्यक्षम होईल आणि प्रवाशांना उत्तम सुविधा मिळतील,असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बस स्थानकातील विविध स्टॉलला भेटी दिल्या व शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.