वंचितकडून शिरूर मधून मंगलदास बांदल तर पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

          पुणे : लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा सातत्याने व्यक्त करणारे मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना अखेर वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी रात्री उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पुण्यातील निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, मोरे यांच्या उमेदवारीचा नेमका फायदा महायुतीला की, महाविकास आघाडीला होणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. मोरे वंचित बहुजन आघाडीमध्ये येत्या गुरुवारी प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

          दरम्यान, शिरूरमधून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील व मविआचे डॉ अमोल कोल्हे यांच्या शी बांदल यांचा सामना होणार आहे. बारामतीमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांना वंचितने पाठिंबा दिला आहे.

          लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असतानाही पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नकारात्मक अहवाल दिल्यामुळे मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यासाठी शरद पवार, संजय राऊत यांची त्यांनी भेट घेतली होती. मात्र त्यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. त्यामुळे मोरे यांनी सकल मराठा समाजाच्या बैठकीच्या माध्यमातून पाठिंबा मिळविण्याची चाचपणी केली होती.

         मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी आंतरवाली सराटी येथे भेट घेतली होती. त्यानंतर वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारीसाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. वंचित बहुज विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची त्यांनी गेल्या शुक्रवारी भेट घेतली होती. त्यानंतर मोरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने पुण्यातील लढत तिरंगी होणार आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना, तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. मोरे निवडणुकीच्या रिंगणात आल्याने मोहोळ यांना, की धंगेकर यांना मतविभागणीचा फटका बसणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.