
दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
पुणे : महान क्रांतिकारक बुद्धिवादी समाजसेवक, थोर देशभक्त, प्रखर हिंदू राष्ट्रवादाचे जनक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील कवितांचा कार्यक्रम स्वातंत्रवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे झाला. या कार्यक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी वीर सावरकर यांच्यावरील कवितांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी बोलताना आयोजक प्रियाताई बेर्डे म्हणाल्या, ”जसे आदरणीय वीर सावरकर एक क्रांतिकारक, सुधारणावादी म्हणून ग्रेट होते; तसेच ते कवी म्हणूनही मोठे होते.”
यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा सांस्कृतिक आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रियाताई बेर्डे, सुर्यदत्ता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संजयजी चोरडिया, अभिनेते गिरीष परदेशी, लेखक दिग्दर्शक केदार सोमण, निर्माते अमर गवळी, निर्माते वेंदग महाजन, निर्मिती व्यवस्थापक धनंजय वाठारकर, अभिनेत्री विद्या पोकळे, अभिनेत्री माधुरी जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाजपच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रियाताई बेर्डे म्हणाल्या की,”वीर सावरकर यांची देशासाठी असणारी समपर्णाची भावना अमोघ होती. ते प्रखर राष्ट्रवादी होते, ते हिंदूत्वाची ज्वाला होते, ते सुधारणावादी होते, त्याच बरोबर ते मोठे कवीही होते. त्यांचे काव्य म्हणजे काळ्या कातळालाही पाझर फोडणारे होते. त्यांच्या काव्यात कल्पकता, रचनात्मकता, व्यावहारिकता दिसते. मात्र एक आहे; अंदमानातील त्या सेल्युलर जेलच्या भिंतींनाहीं त्यांच्या साहस व दृढ विश्वासाला बंदिस्त करता आले नाही.
दरम्यान, ज्यांनी आपले प्राण पणाला लावून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांचे आपण काहीतरी देणं लागतो, याच भावनेतून वीर सावरकर यांच्या हळव्या कविमानचा पैलू नवीन पिढीला माहिती व्हावा या उद्देशाने आपण आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कविता आणि क्रांती या दोन्ही गोष्टी कशा एकत्रित समन्वय साधत चालू शकतात याचेच आपल्या सर्वांना आश्चर्य वाटते. पण अशक्यालाही शक्य करणारं व्यक्तिमत्व म्हणजे वीर सावरकर.”
कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक आघाडीकडून तसेच लक्ष्य कला मंच, नटरंग अकॅडमी, प्रियदर्शनी अकॅडमी, श्रीमंथ इंटरटेन्मेंट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कवितांचे सादरीकरण जन्मदा संस्थेच्या गीतकार व संगीतकार यांनी केले तर कार्यक्रमाचे निवेदन श्री. जतीन पांडे यांनी केले.