दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
पुणे : देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पुरुषोत्तम दत्तात्रेय मोरे 9 मतांनी विजयी झाले. पुढील दोन वर्षांसाठी ते अध्यक्षपदी राहणार आहेत. संस्थानचे विद्यमान अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांची मुदत संपल्याने अध्यक्ष पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या रिंगणात दोन जण होते.
पुरुषोत्तम महाराज मोरे यांना 164 मते मिळाली; तर उमेश सुरेश मोरे यांना 155 मते मिळाली. तीन मते बाद झाली. त्यामुळे पुरुषोत्तम महाराज मोरे नऊ मतांनी विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश मोरे होते.
भास्कर मोरे, शामकांत मोरे, सुजित मोरे सहायक अधिकारी होते. संत तुकाराम महाराज संस्थानच्या गणेशबुवा, गोविंदबुवा आणि आबाजी बुवा अशा तीन शाखा आहेत. दर दोन वर्षांनी अध्यक्ष पदाची निवडणूक होते. या वर्षी गणेशबुवा शाखेतील दोन उमेदवार होते.
त्यापैकी पुरुषोत्तम मोरे निवडणुकीत विजयी झाले. सर्व शाखांतील एकूण 372 मतदार होते. त्यापैकी 322 मतदारांनी मतदान केले. पुरुषोत्तम महाराज मोरे म्हणाले, ’वारकरी संप्रदायाचे कार्य सामान्य माणसांपर्यंत गेले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणार असून, भाविकांसाठी सुविधा तसेच इंद्रायणी नदी शुद्धीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संस्थानचे विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली कामे करण्यात येतील.’