वारकरी विचारानेच आपला महाराष्ट्र पुढे जात आहे :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्र हा नेहमीच वारकरी विचाराने पुढे गेलेला आहे. तो भविष्यातही पुढे जाईल. या विचारांची आठवण सतत राहावी म्हणून आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच दर्शन घेण्यासाठी आळंदीत आल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

        देवेंद्र फडणवीस यांचं आळंदीत टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी हातात टाळ घेऊन माऊलींचा गजर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री पंकजा मुंडे, विधानपरिषद सभापती राम शिंदे, आमदार अमित गोरखे, शंकर जगताप, प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथजी, भावार्थ देखणे, हभप चैतन्य महाराज कबीरबुवा, संजय महाराज घुंडरे, भाजपा शहराध्यक्ष किरण येळवंडे आदी उपस्थित होते.

         देवेंद्र फडणवीस म्हणाले,पांडुरंगाच्या आशीर्वादाने आम्हाला मोठा विजय मिळाला आहे. त्यानंतर आळंदीत येऊन माऊलींच दर्शन घेण्यासाठी आलो आहे. हा क्षण अत्यंत सुखाचा असतो. तो क्षण मला अनुभवायला मिळाला आहे. पुढे ते म्हणाले, वारकरी विचाराने महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. भविष्यात ही पुढे जात राहील. या विचारांची आठवण सतत होत राहावी म्हणून इथे आलो आहे. पुढे ते म्हणाले, इंद्रायणी स्वच्छतेचे काम सुरू आहे. हे एक दिवसाच काम नाही. गावांच, शहरांच आणि उद्योगांचं पाणी हे नदीत सोडलं जात. ते शुद्ध करून इंद्रायणीत सोडायच आहे. ते काम सुरू केलं आहे. संबंधित गावांना, ग्रामपंचायत, महानगर पालिकांना निधी उपलब्ध करून देत आहोत. ते युद्ध पातळीवर सुरू करू अस आश्वासन ही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.