ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) साकोली येथे कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘बालीका दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एम. ए. सय्यद, प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकिय अधिकारी विनोद किरपान व सातिश गोटेफोडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कु. तन्वी परशुरामकर या बालीकेच्या हाताने करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता प्राचार्य सय्यद यांनी विद्यार्थ्यांना स्फूर्तिनायिका यांच्या जिवनचरित्राविषयी माहितीत सांगितले की ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते. शिक्षणापासून व स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी ठेवले जात होते.
त्या काळात स्त्री शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून ज्ञानाईने अथक प्रयत्न केले. दलितांना मायेने जवळ करणाऱ्या व स्त्रीयांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या तसेच थोर सामाजिक कार्याविषयाची कृतज्ञता म्हणून हा बालिकादिन साजरा करण्यात येतो.
भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाईचे गुण अंगिकारुन समाजकार्यात तसेच देशाच्या विकासात सहकार्य करावे असे आव्हान केले.
विद्यार्थ्यांनी ज्ञानाईच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विविध रंगारंग कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यामध्ये गीत गायन, समुहगीत, नक्कल, एकांकिका, पथनाटय व समुहनृत्यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.