पुणे : महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे व
न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी शाळेच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा २०२२-२३ चा शुभारंभ माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी शाळेवरील जलतरण तलाव येथे झाला.
या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५० हून अधिक शाळा व ५२२ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळून त्यांना पुढे विभागीय, राज्य व राष्ट्रीय पातळीवर नाव कमविण्याची संधी मिळते. यातूनच जगामध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारे गुणवंत खेळाडू निर्माण होतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही स्पर्धा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात कुठेही कमी पडू नये म्हणूनच अतिशय दर्जेदार असा स्विमिंग पूल येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुलात साकारला आहे, असे प्रतिपादन या उद्घाटन प्रसंगी आढळराव पाटील यांनी केले.
या स्पर्धेत १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या वयोगटात फ्री स्टाईल स्ट्रोक, बटर फ्लाय स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक या प्रकारांमध्ये स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखविले. या जलतरण स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना विभागीय स्तरावरील स्पर्धेमध्ये भाग घेता येणार आहे.