आरक्षणासाठी गडचिराेलीत आदिवासींचा दाेन तास चक्कजाम…. — धनगर वा इतर जातींना आदिवासीमधे समावेश करण्यास विराेध…. — विवीध मागण्यांबाबत तहसीलदार यांना निवेदन….

प्रितम जनबंधु 

  संपादक 

         गडचिराेली :- धनगर किंवा इतर काेणत्याही जातींना आदिवासींमध्ये समाविष्ट करू नये, शासकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी राज्य शासनाने काढलेला शासन निर्णय रद्द करावा, या मुख्य दाेन मागण्यांसाठी जिल्ह्यातील हजाराे आदिवासींनी गडचिराेली शहरातील इंदिरा गांधी चाैकात दुपारी दुपारी १.३० वाजेपासून ३.३० वाजेपर्यंत चक्काजाम आंदाेलन केले.

                 आदिवासी संघटनांनी आपल्याच लोकप्रतिनिधींना इशारा दिलाय. आधीच बोगस आदिवासींमुळे खरा आदिवासी नाडवला जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यातच आता धनगरांचा समावेश झाल्यास मूळ आदिवासींना पुन्हा जंगलात जावे लागेल अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली आहे. गडचिरोलीतील आदिवासी लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. तर आदिवासी मोर्चेक-यांनी राज्य शासन- मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या मोर्चात भाजपचे आमदार व काँग्रेसचे माजी आमदार देखील सहभागी झाले. या मोर्चाने गडचिरोली शहरातील वाहतूक काहीवेळ पूर्णतः ठप्प झाली होती.

               गडचिराेली जिल्ह्यातील आमदाराच्या तीन व खासदाराची एक जागा आदिवासींसाठी आरक्षीत आहे. आदिवासींच्या मतांवर निवडून आल्यानंतर आमदार विधानसभेत आदिवासीं विराेधातच बाेलत असल्याचे शल्य व्यक्त केले. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या अनेक जाती अनुसूचित जामातीत समावेश करावा, यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत. मात्र आदिवासी आमदार सुस्त बसले आहेत. आदिवासींनी जपून ठेवलेली साधनसंपत्तीची लूट कंपण्यांमार्फत केली जात आहे. मात्र येथील आमदार व खासदार काेणताही विराेध करीत नाही. आदिवासी आमदार असतानाही ते जर आदिवासींसाठी लढत नसतील तर त्यांचा फायदाच काय? असा प्रश्न आंदाेलक विचारत हाेते.

              दुपारी १.३० वाजेपासून चक्काजाम आंदाेलन करण्यास सुरूवात झाली. आ. डाॅ. देवराव हाेळी, माजी. आ. डाॅ. नामदेव उसेंडी, काॅंग्रेसचे जिल्हा प्रभारी डाॅ. नामदेव किरसान आंदाेलन स्थळी पाेहाेचले. शहरातील चारही बाजूची वाहतूक ठप्प पडल्याने आंदाेलन मागे घेण्याची विनंती केली जात हाेती. मात्र जाेपर्यंत जिल्ह्यातील तीनही आमदार व खासदार येत नाही. ताेपर्यंत काहीही झाले तरी आंदाेलन मागे न घेण्याचा इशारा आंदाेलकांनी दिला होता. 

             दुपारी ३.३० वाजेपर्यंत आंदाेलन सुरूच हाेते. मध्यंतरी पाऊस झाला. तरीही आंदाेलक आपल्या जागेवरून हटले नाहीत. आंदाेलनाचे नेतृत्त्व सुरज काेडापे, कुणाल काेवे, बादल मडावी, अश्विन मडावी, सतीश पाेरतेट, साेनू कुमरे, सुनिल कुमरे, आशिष आत्राम, क्रांती केरामी, लालसू नागाेटी यांनी केले.

         मागण्यांचे निवेदन काेणत्याही लाेकप्रतिनीधीला न देता तहसीलदारांना देण्याचा निर्णय घेतला. गडचिराेलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर हे आंदाेलनस्थळी पाेहाेचले. आंदाेलनाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना निवेदन दिले.

            दुपारी १.३० ते ३.३० वाजेपर्यंत चक्काजाम आंदाेलन चालल्याने ट्रक व बसेसची, ट्रकची मोठी रांगच रांग लागलेली दिसुन येत होती. पर्यायी व्यवस्था म्हणून चारचाकी व दुचाकी वाहने शहरातील आतमधील रस्त्यांनी काढली जात हाेती. गडचिराेलीचे ठाणेदार अरूण फेगडे यांच्या नेतृत्त्वात चाेख पाेलीस बंदाेबस्त ठेवला हाेता. त्यामुळे काेणतीही अनुचीत घटना घडली नाही.

               अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोली, अदिवासी एकता युवा समिती, आदिवासी गोंडवाना गोटूल समिती नवेगाव-मुरखळा, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन गडचिरोली, कै. बाबुरावजी मडावी स्मारक समिती, गडचिरोली, गोटूल सेना, बाबुराव पुलेश्वर शेडमाके स्मारक समिती, जस्टीस फॉर मुव्हमेंट, गोंडवाना गणतंत्र पार्टी, जेडीयू, पोलीस बॉईज असोसिएशन या संघटना आदाेलनात सहभागी झाल्या हाेत्या.

          जिल्ह्यातील तिनही आमदार व खासदार आदिवासींच्या आरक्षणावर निवडून आले आहेत. त्यामुळे आदिवासींच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करणे त्यांची जबाबदारी आहे. येथील लाेकप्रतिनिधींना हे आंदाेलन म्हणजे इशारा हाेता. आदिवासींच्या अधिकारावर गदा आणल्यास जिल्हाभर आंदाेलन केले जाईल. असा इशारा आंदाेलनाचे नेतृत्त्व सुरज काेडापे यांनी यावेळी दीला.