आज लाडक्या,”सर्जा-राजाचा, पोळा हा सण मोठ्या उत्साहात होतोय साजरा…. — विविध शब्दात बैलाप्रती व्यक्त केली जातय कृतज्ञता….

प्रितम जनबंधु

     संपादक

            विशेषतः भारत हा कृषिप्रधान देश आहे.आज बैलपोळ्याचा सण आहे.विदर्भात मोठ्या प्रमाणात हा सण पारंपारिक उत्साहात साजरा केला जातो. 

       प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साजशृंगार करतात.बैल सजवतात,त्यांची सजवून मिरवणुक काढली जाते.या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते.गावातल्या सर्व बैलजोड्या,वाजंत्री,सनई,ढोल,ताशे वाजवत मारुतिच्या मंदिराजवळ एकत्र आणल्या जातात.

        तोरण तोडते वेळेस ‘झडत्या’ म्हणायची पद्धत आहे. नंतर “हर बोला हरहर महादेव” चा जयघोष करुन तोरण तोडले जाते व पोळा ‘फुटतो’.मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते.पुरणपोळीचे जेवन दिले जाते. 

      बैल नेणार्‍यास ‘बोजारा’ देण्यात येतो.असा हा पोळ्याचा सण आहे.पोळा श्रावण अमावास्या तिथीला साजरा करण्यात येतो.वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.

      शेतीप्रधान देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पीकधान्य झुलत असते.सगळीकडे हिरवळ असते.श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.

       श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते.सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’!”या दिवशी,बैलांचा थाट असतो व त्यांना कामापासून आराम असतो. 

     पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते.पोळ्याला त्यांना नदी,ओढय़ात नेऊन धुण्यात येते.नंतर चारून घरी आणण्यात येते.या दिवशी बैलाच्या खोंडाला हळद व तुपाने शेकले जाते.त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल सर्वांगावर गेरूचे ठिपके,शिंगांना बेगड,डोक्याला बाशिंग,मटाक्या,गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा,नवी वेसण,नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे,खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य असतो.

       आजच्या दिवशी मोठ्या उत्साहानं शेतकरी आपल्या सर्जा राजाची पूजा करुन त्याला पुरणपोळी भरवतात.

       पोळ्याचे महत्त्व शेतकरी वर्गात फार आहे.शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो.शेतकर्‍याचा सखा,मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. 

      पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते.पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो.त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात.शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झूल टाकली जाते.गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात.अशा नाना तर्‍हेने सजविण्यात येते.

         शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून त्या पाहुण्यांची वाट पाहत असतात.तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते.

         दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजतगाजत जातात व त्याला ‘अतिथी देवो भव:’ प्रमाणे घरी आणतात.घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात.

       त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात.या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते.शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. 

        महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो.ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. 

        त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो.

      बळीराजाचा लाडका बैल तो शेतात अहोरात्र राबत असतो तेव्हा त्याला धान्य पिकवण्यास मदत होते.त्यामुळे बैलाप्रती कृतज्ञता आणि प्रेम,आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात बैल पोळा हा सण साजरा केला जातो. 

        विदर्भात बैल पोळाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळा साजरा करण्याची प्रथा आहे.लहान मुलं लाडकीच्या बैलाला सजवून दारोदारो आपले नंदीबैल घेऊन जातात.यादिवशी अनेक ठिकाणी लहान मुलांना आणि नंदीबैलाला सजविण्याची स्पर्धा आयोजित केली जाते.

     बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो.शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे.या दिवशी बैलाची पूजा करून गावभर त्याची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते.गावात मिरवणूक झाल्यानंतर घरी महिला बैलांची पूजा करतात.

       काही ठिकाणी मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात.या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा,पुरणपोळी,कढी,भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात. 

        तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या म्हटले जाते.तर काही ठिकाणी ‘बेंदूर’ असे देखील म्हणतात.तर दक्षिणेत या सणाला ‘पोंगल’ आणि उत्तर व पश्चिम भारतात ‘गोधन’ असे म्हटले जाते.

         अशा या विविधांगी तर्‍हेने चोहीकडे उत्साहात साजरा होणाऱ्या बैलपोळा या महत्वपुर्ण सनाच्या अनुषंगाने समस्त शेतकरी बांधवाना दखल न्यूज भारत परीवाराकडुन हार्दिक हार्दिक शुभेच्या…..