कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवणी:- आज सकाळी
सात मित्रांसोबत फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांचा पेंच नदीतील घोगरा परिसरात बुडून मृत्यू झाला असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
ही घटना पारशिवणी पोलीस स्टेशनच्या हद्दी अंतर्गत घोगरा परिसर चिखली डोहातील आहे.आलोक उर्फ साहिल अमोल नेवारे (२१ , राहणार बाबा नानक शाळे जवळ मोचीपुरा नंदनवन, नागपूर ) असे मृत विध्यार्थ्यांचे नाव आहे.
आलोक उर्फ साहिल व त्याचे इतर ६ मित्र सकाळी ७ वाजता नागपूर वरून पारशिवणीला येण्यास निघाले होते.ते सकाळी ८ वाजताच्या सुमारास पारशिवणी पासून ३ कि.मी.अंतरावरील पेंच नदीतील श्री क्षेत्र घोगरा महादेव येथे दर्शनला आले.मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते आंघोळी करिता मंदिर परिसरापासून ३०० मीटर अंतरावरील नदीतील चिखली डोहा जवळ आले.
यावेळी काही मित्रांनी नदीच्या किनाऱ्यावर आंघोळी केल्यात.सकाळी ८.४५ च्या सुमारास मला पोहता येते असे म्हणत आलोक उर्फ साहिल नेवारे हा पाण्यात दूर जाऊ लागला. काही वेळातच तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.
तो दूरवर असल्यामुळे कुणीही त्याला वाचवू शकले नाही.अशातच मित्रां समोरच तो पाण्यात बुडाला.
लागलीच घटनेची माहिती एक मित्र व्दारे पारशिवणी पोलिसांना देण्यात आली.लगेचच पारशिवनी पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे,उपनिरीक्षक शिवाजी मुंढे व पोसिं राकेश बधाते व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक गोताखोर नावाड्यांच्या मदतिने दुपारी एक वाजताच्या दरम्यान मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.उत्तरीय तपासणी करिता मृतदेह पारशिवणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून पारशिवनी पोलिसानी तक्रारदार मृतकचे वडिल अमोल मधुकर नेवारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्गचा गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे .