नक्षलवाद वैचारिक नव्हे,तर देशविरोधी लढाई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.. – अतिसंवेदनशील भागात देवेंद्र फडणवीस यांचा नागरिकांशी संवाद.. – दामरंचा,ग्यारापत्ती,गट्टा येथील पोलिस स्थानकाच्या इमारतींचे उद्घाटन.

 

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

 गडचिरोली : –

        नक्षलवाद ही विचारांची नाही, तर आता देशविरोधी लढाई आहे. इतर परकीय शक्ती आणि आयएसआयसारख्यांची मदत या नक्षलवाद्यांना आहे. लोकशाही आणि संविधान न मानणार्‍यांची ती लढाई आहे,असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

         महाराष्ट्र दिनी,राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली.ज्या ठिकाणी 30 एप्रिलला तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले, त्या नजीक असलेल्या दामरंचा आणि दुसरीकडे थेट छत्तीसगडच्या सीमेवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला. सी-60 जवानांचा गणवेश परिधान करुन एकप्रकारे मीही तुमच्यापैकीच एक आहे आणि तुमच्यासोबत आहे,असा संदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला आणि त्यांचा उत्साह वाढविला,त्यांचा सत्कारही केला. 

        सायंकाळी झाालेल्या कार्यक्रमावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, अपर पोलीस महासंचालक (वि.कृ.) म.रा. मुंबई, प्रविण साळुंके, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र संदिप पाटिल, जिल्हाधिकारी संजय मिणा, पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख उपस्थित होते.

     या नक्षल कारवायांमध्ये सामान्य माणसांचे बळी गेले आहेत. आदिवासी, अनुसूचित जातीच्या लोकांचे बळी गेले आहेत. लोकहिताची, व्यापक विकासाला कायम नक्षल विचारधारेने विरोध केला आहे. त्यामुळेच एकिकडे या समस्येविरोधात लढणार्‍या जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी तर दुसरीकडे जनतेशी संवाद साधण्यासाठीच आपण येथे आलो आहोत. गडचिरोलीत यापूर्वीही मी दोन वेळा मुक्काम केला आहे आणि आजही मुक्काम करत आहे. कदाचित गडचिरोलीत थांबणारा मी पहिलाच मुख्यमंत्री होतो, असेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले.

   आज शहरी नक्षलवादाची सुद्धा मोठी समस्या आहे. पोलिस भरतीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. जेव्हा स्थानिक स्तरावर नक्षलवाद्यांना यश मिळत नाही, तेव्हा ते लोकांचे ब्रेनवॉश करुन ही लढाई शहरांमध्ये लढू पाहताहेत. लोकशाही आणि संविधान न मानणे, हेच त्यांचे काम आहे. ही अराजकता आहे. गेल्या कालावधीत असेच एक मोठे नेटवर्क ध्वस्त करण्याचे काम आम्ही केले होते, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. गडचिरोलीत कनेक्टिव्हीटी वाढविण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे. सुजरागडच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक येते आहे, असेही त्यांनी सांगितले.

    प्रारंभी दामरंचा आणि नंतर ग्यारापत्ती या दोन्ही ठिकाणी त्यांनी पोलिस इमारतींचे उद्घाटन केले. दामरंचा हा गडचिरोलीचा अहेरी तालुक्यातील दक्षिणी भाग, तर ग्यारापत्ती उत्तर गडचिरोलीतील, थेट छत्तीसगडच्या सीमेवर. 30 एप्रिलला 3 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले, ते ठिकाण दामरंचा येथून 7-8 कि.मी. अंतरावर. त्याच भागात देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला. आपले जवान धोका पत्करुन काम करतात. त्यांचे मनोबल वाढविणे आणि नागरिकांशी संवाद साधणे, हाच त्यामागचा दुहेरी उद्देश. ग्यारापत्ती हे महाराष्ट्रातील शेवटचे गाव, तेथूनच छत्तीसगड सुरु होते. पण, पुढे 35 कि.मी.पर्यंत कोणतेही पोलिस स्थानक नाही.

      अतिसंवेदनशील भागात साधारणत: कुणी भेटत नाही, तेथे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी वैयक्तिक संवाद साधला. एसटीचा अर्ध्या तिकिटात प्रवास, शेतीच्या कोणकोणत्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात, असे प्रश्न त्यांनी महिला, पुरुषांकडून विचारले आणि शासकीय योजनांबाबत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. काही महिलांनी सध्या केवळ सकाळी आणि सायंकाळीच बस येते, दुपारी बस सुरु करा, अशी मागणी केली. त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचवेळी महिलांना अर्धे तिकिट आणि लेक लाडकी या योजनांचे महिलांनी स्वागत सुद्धा केले. आदिवासी बांधवांनी पारंपारिक पद्धतीने स्वागत केले.

      गडचिरोली येथे देवेंद्र फडणवीस यांनी शहीद स्मारकाला अभिवादन केले. पोलिस अधीक्षक कार्यालयातील एकलव्य सभागृहात त्यांनी सी-60 च्या जवानांचा सत्कार केला. या नूतन सभागृहाचे सुद्धा उद्घाटन केले. दादालोरा खिडकी या नावाने एक योजना गडचिरोली पोलिस राबवित असून, शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम गडचिरोली पोलिस करीत आहेत. या योजनेशी प्रशंसा करतानाच काही लाभांचे वितरण या दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

       संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री यांचे हस्ते, पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील एकलव्य धाम सभागृहाचा नुतनीकरण उद्घाटन समारंभ पार पाडला. उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री यांनी एकलव्य धाम येथुन अतिसंवेदनशिल पोलीस मदत केंद्र गट्टा (जां.) येथील नवीन प्रशासकिय इमारतीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. त्यानंतर नक्षलविरोधी अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र व मोमेंटो देवून सत्कार केला. यासोबतच महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंधेला नक्षलवाद्यांचा मोठा घातपाताचा डाव उधळून लावत ३ जहाल नक्षलींना कंठस्नान घालणाऱ्या सी-६० च्या कमांडोंचे उपमुख्यमंत्री यांनी कौतुक केले व त्यांचा सत्कार केला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या सी ६० कमांडोचे भरभरुन कौतुन केले. तसेच अशीच चांगली कामगिरी त्यांनी करुन गडचिरोली जिल्हा हा नक्षलमुक्त करावा. गडचिरोली पोलीस दलास जे काही मदत लागेल ती मी गृहमंत्री व वित्तमंत्री या नात्याने तात्काळ पुर्ण करेन अशी त्यांनी ग्वाही देत जवानांचे मनोबल उंचाविले. त्यानंतर ७.३० वा. पर्यंत सर्व पोलीस अधिकारी अंमलदार यांचा दरबार घेऊन उपस्थित सर्व अधिकारी अंमलदार यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या लवकरात लवकर पुर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या निष्पाप साईनाथ नरोटे याच्या कुटुंबियांना ०८ लाख रुपयाची आर्थिक मदत व नक्षलपिडीत प्रमाणपत्र वाटप केले. यावेळी उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या मागिल कामगिरीचा आढावा घेवुन, उत्कृष्ट कामगिरीबाबत शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र शासन गडचिरोली पोलीस दलाच्या नेहमी पाठीशी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाआधी गडचिरोली शहरालगतची हवाईपट्टी तसेच मेडिकल कॉलेजच्या जागेची पाहणी फडणवीस यांनी केली.