नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
आजच्या धावपळ आणि धकाधकीच्या जिवनामध्ये आपल्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.अशाप्रसंगी सर्व सामान्य,गोरगरीब तसेच जेष्ठ नागरिकांना दुर्धर आजारांवर अर्थिक दृष्टया महागडे उपचार करणे शक्य होत नाही.त्यामुळे केवळ उपचारा अभावी त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो,हि गोष्ट लक्षात घेऊन आपण आरोग्याच्या बाबतीत सबंध तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रामध्ये अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याची माहिती माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे – आपला दवाखाना या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र सोनई नगर,इंदापूर येथे पार पडला, यावेळी आ.भरणे बोलत होते. राज्यामध्ये “हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे-आपला दवाखाना” डिजिटल अनावरण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सकाळी 10:00 वाजता एकाचवेळी राज्यातील 342 ठिकाणी या डिजिटल दवाखान्यांचे अनावरण करण्यात आले.याप्रसंगी इंदापूर मधून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ पार पडला.
यावेळी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,आपल्या बदलत्या जिवनशैली मुळे आज आरोग्याचे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.कोरोना सारख्या महामारी मध्ये संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजला होता.यामध्ये किड्या-मुंग्यासारखी माणसे मरत होती.असे असताना इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून आपण जिवाचे रान करून तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेतली होती.तसेच मी स्वतः वेळप्रसंगी कोव्हिड सेंटरमध्ये जावून नागरिकांना धीर देत होतो.परंतु अनेक जिवाभावाचे सहकारी यादरम्यान आपण गमावले आहेत.त्यामुळे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे जनतेचे आरोग्य असून,गोरगरिबांना तालुक्यातच चांगल्याप्रकारचे उपचार कसे मिळतील हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन सरकारी रूग्णालयांमध्ये अत्याधुनिक सोईसुविधा तसेच तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम आपण आणली असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले.
तसेच तालुक्यातील गरजू रूग्णांना पुणे-मुंबईतील मोठ-मोठ्या दवाखान्यात लाखो रूपयांच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी आपण दररोज अनेकांना मदत करत असून आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील गरजू नागरिकांना अतिशय चांगले उपचार मिळतील असा विश्वासही शेवटी आमदार भरणे यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा अंकिता शहा,राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष अमोल भिसे,जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ,गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांच्यासह विवध मान्यवर व अधिकारी वर्ग उपस्थित होते.