चिमूर तालुक्यात खनिज संपदा लुटल्यानंतर आता भिसी वनक्षेत्रात वनसंपदा लुटण्याचा सपाटा…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक..

चिमूर,२ मार्च – चिमूर तालुक्यात खनिज संपत्तीच्या अमर्याद लुटीनंतर आता भिसी वनक्षेत्रात वनसंपदा लुटण्याचा नवा अध्याय सुरू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फायदा घेत बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्याने जंगलातील वन्यजीव संसाधनांची तस्करी वाढण्याची शक्यता आहे.

          परिणामी,जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला असून स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे…

*****

खनिज संपत्तीची लूट आणि त्याचा परिणाम…

       चिमूर तालुका हा विदर्भातील एक महत्त्वाचा खनिज संपत्तीने समृद्ध भाग आहे.याठिकाणी कोळसा,वाळू,मुरूम आणि इतर खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर आढळते. 

       मात्र,वर्षानुवर्षे सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननामुळे नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास झाला आहे. वैयक्तिकरित्या व मोठमोठ्या कंपन्यांनी याठिकाणी उत्खनन करत मोठ्या प्रमाणावर नफा मिळवला असला तरी स्थानिक नागरिकांच्या हाताला मात्र बेरोजगारी आणि पर्यावरणीय संकटच आले आहे.

        खनिज संपत्तीच्या या अमर्याद लुटीमुळे भूजलपातळी खालावली,शेती उत्पादन घटले,आणि प्रदूषणाच्या समस्याही निर्माण झाल्या.

       जंगलाच्या आसमंतात आणि इतर रेतीघाटावरुन मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा आणि मुरूम उत्खनन झाल्याने शेतीयोग्य जमीन नष्ट झाली आहे.

******

भिसी वनक्षेत्रात नव्या लुटीचा आरंभ…

      खनिज संपत्तीची लूट संपल्यानंतर आता भिसी वनक्षेत्रात वनसंपत्तीची बेकायदेशीर तस्करी सुरू झाली आहे.या वनक्षेत्रात सागवान,आजन,मोह,आणि इतर मौल्यवान झाडांची विपुलता आहे. 

        मात्र,काही प्रभावशाली दलाल आणि स्थानिक माफिया यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे.

       वनविभागाकडून वेळोवेळी कारवाईचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात आहेत. 

       यातील लाकूड वेगवेगळ्या माध्यमांतून तस्करांपर्यंत पोहोचते आणि लाखो रुपयांत विकले जाते.विशेषतः सागवान आणि जळाऊ लाकडांच्या तस्करीला अधिक मागणी असून,ही लूट रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही.

******

वन्यजीवांवर संकट आणि पर्यावरणीय परिणाम….

        भिसी वनक्षेत्र हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिघात येतो.त्यामुळे येथे वाघ,बिबट्या,अस्वल,सांबर, चितळ,नीलगाय आणि असंख्य पक्षी आढळतात. 

         मात्र,झाडे तोडल्याने त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत.परिणामी,हे प्राणी मानवी वस्त्यांमध्ये शिरण्याचे प्रमाण वाढले आहे.

        याचबरोबर वाघाने अनेक गावात प्रवेश करून जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.वनतोडीमुळे जंगलाचा आकार लहान होत चालल्याने मोकाट जनावरे आणि मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे.

*****

प्रशासनाची भूमिकाच संशयास्पद?

      स्थानिक ग्रामस्थ आणि इतर व्यक्ती अनेकदा याबाबत तक्रारी करतात.मात्र,वनविभाग आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.अनेकदा अवैध वृक्षतोडीविरोधात तक्रारी दाखल करूनही दोषींवर कठोर कारवाई होत नाही.

      काही समाजसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.मात्र,मोठे राजकीय हस्तक्षेप आणि प्रभावशाली तस्करांमुळे प्रशासनावर दबाव असल्याचे सांगितले जाते.

******

संतप्त नागरिकांचा लढा आणि पुढील दिशा…

       या विनाशकारी परिस्थितीविरोधात आता स्थानिक नागरिक,पर्यावरण कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना का म्हणून पुढे येत नाही?ते वनसंपत्तीच्या लुटीविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा का म्हणून देत नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

*******

पर्यावरण तज्ज्ञांचे मत…

     पर्यावरण तज्ज्ञांच्या मते,जर ही लूट वेळीच थांबवली नाही,तर येत्या काही वर्षांत भिसी वनक्षेत्राचा संपूर्ण ऱ्हास होईल.जैवविविधता नष्ट होईल आणि हवामान बदलाचा मोठा फटका बसेल.

******

सरकार आणि प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज….

      वनसंपत्तीचा ऱ्हास रोखण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे.वनतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई वेळीच करणे गरजेचे आहे.

      जर प्रशासन आणि सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत,तर भविष्यात संपूर्ण पर्यावरण धोक्यात येईल आणि स्थानिक जनतेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल असे चिन्हे दिसू लागली आहेत.