— भाजपाच्या सत्ता, पैसा व दहशतीला कसब्याच्या जनतेने चोख उत्तर दिले

पोटनिवडणुकीच्या विजयाचा टिळक भवनमध्ये मिठाई वाटून, फटाके फोडून जल्लोष..

 

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

        मुंबई : कसबा पेठ या भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेली २८ वर्ष या मतदारसंघातून भाजपा उमेदवार निवडून येत असे पण यावेळी कसबा पेठच्या जनतेने भाजपाचा डाव उधळून लावला. पुणे हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचे शहर असून माजी राज्यपाल व भाजपाने सातत्याने या विचाराचा अपमान करण्याचे पाप केले, जनतेला हे आवडले नाही म्हणून जनतेने मतपेटीतून भाजपाला जागा दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून, फटाके फोडून साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आमदार विकास ठाकरे, आ.वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, उत्कर्षा रुपवते, प्रवक्त्या भावना जैन, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद, अर्चना राठोड, ज्येष्ठ नेते दत्ता नांदे, अशोक आमानकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, कसबा पेठ पोटनिवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पैशाचा वारेमाप वापर करत मते विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली. पैशाच्या जीवावर राजकारण करणाऱ्या भाजपाला जनतेने चोख उत्तर दिले आहे. कसब्याच्या जनतेला भारतीय जनता पक्षाने गृहीत धरले होते पण भाजपाची खरी संस्कृती काय आहे हे या पोटनिवडणुकीत कसबा व महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. मंत्री व पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप करण्यात आल्याचे प्रकार घडले, तडीपार गुंड मंत्र्यांसोबत फिरतानाही लोकांनी पाहिले. पैसे वाटून, दहशत निर्माण करुन निवडणूक जिंकण्याचे भाजपाचे प्रयत्न जनतेने उधळून लावले. 

कसबा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह डझनभर मंत्री तळ ठोकून होते. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने सर्व प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही. महागाई, बेरोजगारीने त्रस्त जनता व छोटे व्यापारी यांनी भाजपाला धडा शिकवला आहे. सत्तेचा दुरुपयोग भाजपा कसे करतो याचे दर्शन कसबा पोटनिवडणुकीत जनतेने पाहिले. कसबा पोटनिवडणुकीचा निकाल हा भाजपाची उलटी गिनती सुरु झाल्याचे दर्शवणारा आहे. रविंद्र धंगेकरांना बहुतमाने निवडून दिले त्याबद्दल कसबा पेठ मतदार संघातील जनतेचे व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व महाविकास आघाडीच्या सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे नाना पटोले यांनी यावेळी आभार व्यक्त केले. 

तामिळनाडू व पश्चिम बंगालमधील पोटनिव़डणुकीतही काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला आहे. त्रिपुरामध्ये काँग्रेसचा एकही आमदार नव्हता तेथे पाच मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी झाले, नागालँड विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. देशभरातील निकालात काँग्रेस पक्षाला लोकांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे, आगामी काळातील निवडणुकांमध्ये हेच चित्र कायम राहणार असून ही परिवर्तनाची सुरुवात आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com