दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : पहिल्या दिवसापासूनच वादात सापडलेल्या आणि चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे. कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे आळंदीत निष्ठावंत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला.
आळंदी शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली आळंदीत फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी वडगावकर म्हणाले की दोन हजार रुपयांच्या नोटांचा पाऊस कसब्यात पाडूनही कमळ चिखलात गाडले गेले हा जनतेचा कौल आहे. महागाई, भ्रष्टाचार, शेतीमालाला भाव नाही बेरोजगारी, गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ याचा भडका मतदार इथून पुढे येथून पुढे मतपेटी द्वारे नक्कीच दाखवतील ईडी, सीबीआय शासकीय यंत्रणाचा गैरवापर मनमानी कारभार यामुळे जनता त्रस्त झालेली आहे त्याचा उद्रेक निवडणुकीत दिसून आला. अखेर भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचं काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी सांगितले.