दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
पुणे : पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने ज्येष्ठ उद्योजक आणि समाजसेवक नितीनजी देसाई यांना गौरवण्यात आलं. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्लजी पटेल यांच्या शुभहस्ते आणि पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ.रघुनाथजी माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे यंदा ३३ वे वर्ष. प्रमुख पाहुणे म्हणून सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष पद्मश्री श्री. प्रतापराव पवार उपस्थित होते.
जायबंद सैनिकांचा गौरवही यावेळी करण्यात आला. यावेळी हवालदार मोहम्मद फैयाज आलम, माजी इंजिनियर लक्ष्मण साळुंखे, लान्स नाईक एम. जे. चाको, माजी रायफलमन नैनसिंग थापा आणि शिपाई वलसलन नाडर आदी जायबंदी सैनिकांचा गौरवही करण्यात आला.
पुण्यभूषण फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ.सतीशजी देसाई गेली ३२ वर्षे पुण्यभूषण पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरवत आहेत. फाऊंडेशनचा पुरस्कार कालानुरुप पुणेकरांच्या वतीनं देण्यात येणारा सन्मान झाला, हे याचं सर्वात मोठं यश आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास सिम्बायोसिसचे संस्थापक शां.ब. मुजुमदार, गो.बं. देगलुरकर, गजेंद्र पवार, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.