मी ( अनंत भवरे ) आजपर्यंत माणूस का बनू शकलो नाही?

मी ( अनंत भवरे ) आजपर्यंत माणूस का बनू शकलो नाही?

     “जन्म आणि मृत्यूच्या दरम्यानचा काळ म्हणजे आयुष्य…

        या आयुष्याला सुखी करण्यासाठी या विश्वातील असंख्य तत्ववेत्ते,महापुरुष यांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्रे ठेऊन,प्रसंगी माझ्यासाठीच बलिदान देऊन माझे आयुष्य सुखी करण्यासाठी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता आपले दुर्मिळ आयुष्य वेचले….

     परंतू,मी केवळ माझ्या स्वतःच्या शारीरिक आणि पारिवारिक भौतिक सुख प्राप्तीसाठीच माझे संपूर्ण आयुष्य वेचले.परंतू ,शेवटच्या काळात मला माझीच रक्ताची नाती मात्र परकी वाटायला लागली…..

       ज्यांना अंगा खांद्यावर खेळवलं….

          तीच नाती माझ्या अंगावर धावून यायला लागली!

         नीती / अनितीच्या मार्गाने पैसा कमवीला,परंतू जेंव्हा तो संपला,तेंव्हा मी सर्वाना शेवटच्या काळात अडचण व्हायला लागलोय.

    परंतू,जेव्हा मला हजारो रुपये पेन्शन मिळते….

        तेंव्हा मात्र माझ्या तब्येतीची खूप काळजी माझी रक्ताची नाती घेतात…!

        अगदी पॆसे काढण्यासाठी उचलून न्यावे लागले तरी ते मागे पुढे पाहत नाहीत.अशा शेवटच्या काळात मनाला एक रेष भेदून जाते…

      की मी माणूस बणन्यात अपयशी का झालो?

       त्याचे कारण शोधताना डोळ्यासमोर भूतकाळातला चित्रपटच दिसू लागला…

        “मी संपूर्ण आयुष्यात सत्य – असत्य, कुशल – अकुशल, खरे – खोटे, चांगले – वाईट इत्यादी गुण / दुर्गुण यांचा कधी फरक न ओळखता दुर्गुणालाच जवळ केल्यामुळे मी माणूस बनू शकलो नाही. हेच सत्य मला मरण्याच्या दोन तास आधी समजले.परंतू , मी ICU मधून बोलू किंवा लिहून व्यक्त होऊ शकत नव्हतो….

        केवळ मरण्याची वाट पाहण्याशिवाय काहीही करू शकत नव्हतो.

         अशा वेळी केवळ हाच पश्चाताप करत होतो की,जर मी तत्ववेत्ते आणि महापुरुषांच्या क्रांतीला जिवंतपणी समजून घेऊन त्यांच्या त्याग आणि संघर्षाला आदर्श मानून जीवनात एक वेळ जरी त्या मार्गावर आचरणातून सिद्ध झालो असतो तर हा अनंत भवरे निश्चितच कदाचित माणूस बनला असता…

         निदान त्या माणूस बनण्याच्या परिघाच्या जवळ तरी निश्चितच पोहोचला असता…

              मी मात्र केवळ माझे अनैतिक दुषकृत्य स्वतःच्या हृदयातील कुठल्यातरी कप्प्यातून घालवून देण्यासाठी घरात महापुरुषांच्या प्रतिमेची रांगच निर्माण केली.त्यासाठी इतरांना देखावा म्हणून मंदीर,मजीद,चर्च,विहारात जाऊन दानी लोकांच्या यादीत नाव कोरण्यासाठी प्रयत्न करू लागलो.थोडक्यात महापुरुषांच्या क्रांतीला स्वार्थासाठी एक अंधभक्त होऊन स्वीकारू लागलो.मी अनेक पदव्या घेऊन त्या आधारे पैसा कमविण्यासाठीच जीवन जगू लागलो.अशिक्षित समाजात मान सन्मान मिळवू लागलो. कोरड्या जाती / धर्माच्या अहंकारात खरे सुख मानू लागलो..

” पैश्याने होत आहे रे आधी पैसेच पाहिजे. “

         या उक्तीप्रमाणे जगू लागलो.अनितीच्या मार्गाने पैसा खूप कमवीला, गडगन्ज संपत्ती कमविली. इतरांच्या मड्यावरचे लोणी मी पळविले. परंतू , इतरांच्या सुख – दुःखात हृदयातून कधी मी सहभागी होऊ शकलो नाही,म्हणून मला माणूस बनण्याची संधी मिळूच शकली नाही.एवढ्या मोठ्या ICU मध्ये अनोळखी डॉक्टर शिवाय कुणीही इथे नाही.माझी मुले,माझी पत्नी,माझे नातेवाईक कुणीही इथे नाही.

कदाचित….

     माझ्या कमविलेल्या अनैतिक संपतीच्या पैश्यातून बांबूच्या तिरडीची आणि चितेची तयारी करत असतील….

       मी जर तथागत भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि जगातील सर्वच तत्ववेत्ते आणि महापुरुष यांच्या आदर्श क्रांतीला वेळीच समजून घेतले असते तर कदाचित मला आता पश्चातापची वेळ आलीच नसती.

            निदान आता तरी मी 2025 च्या 2 जानेवारीपासून महापुरुषांच्या क्रांतीला समजून घेऊन जगण्याचा दृढनिश्चय करुन शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित होवून माणूस बनण्याचा प्रयत्न करतो,त्यासाठी पहिला संकल्प या EVM ला माझ्या देशातून हद्दपार करण्याचा आणि सोबतच संविधान जागृती करण्याचा ..

    आपण?

जागृतीचा कृतिशील लेखक आणि आवाहनकर्ता…

     अनंत केरबाजी भवरे..

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689,