सुधाकर दुधे
तालुका प्रतिनिधी सावली..
सावली – बोथली मार्गावर नव वर्षाच्या पूर्व संधेला अपघातातंर्गत विक्की कोंकावार २६ वर्ष रा बोथली या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता.हा अपघात ताजा असताना पुन्हा याच मार्गावर मौजा मालपिरंजी जवळ दुचाकीला अपघात होऊन एक ठार झाल्याची घटना २ जानेवारी रोजी पहाटे उघडकीस आली.
बंडू दिनकर उबाटे (३१ वर्ष) असे मृतकाचे नाव असून तो मुळचा मौजा लोणार,जि. बुलढाणा येथील रहिवाशी आहे.गोसे अंतर्गत पाणी वाटप या कामावर गेली ३ ते ४ वर्षा पासून तो कार्यरत होता आणि मृतक हा सावली प्रभाग क्र.२ येथे किरायाने राहत होता.
पाणी वाटप कामाचे कंत्राट संपल्याने तो आपल्या स्वगावी गेला होता आणि मृतकाचे काम ब्रम्हपुरी येथे सुरु होते.त्यामुळे मृतकाचे ब्रम्हपुरी -सावली असे जाणे येणे सुरु होते.
घटनेच्या दिवशी मृतक हा एम.एच. 28,बि.एन.8871 या आपल्या होंडा शाईन दुचाकीने कदाचित ब्रम्हपुरी वरुन पाथरी मार्गाने सावली कडे येत असताना त्याच्या दुचाकीला अपघात झाला असावा,असा अंदाज वर्तविल्या जात आहे.
सदरची घटना 2 जाने मंगळवारला उघडकीस आली,घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि उत्तरीय तपासणीसाठी मृतकाचे शव आपल्या ताब्यात घेतले.पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.
मृतक हा विदर्भ पाटबंधारे विभागाच्या गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी वाटप आणि स्वच्छता या कामात गेली ४-५ वर्षांपासून ब्रम्हपुरी विभागात कार्यरत होता.मृतकाच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असुन कुटुंबात दुखा:चे डोंगर कोसळले आहे.
विशेष म्हणजे सदर मार्गावर अनेक ठिकाणी वळने आणि त्यातही रसत्या लगत झुड़पे असल्याने ती अपघाताला आमंत्रण देणारी ठरत असल्याने वाहतुकी दरम्यान अनेकांना आपला जीव गमविण्याची वेळ निर्माण होत आहे….