बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथे लक्ष्मी नरसिंह देवस्थानात दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आसता संगणक परिचालक जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बोडके व तालुका उपाध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी त्यांना निवेदन देण्यात आले.
राज्याध्यक्ष सिध्देश्वर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा संघटना तसेच सोलापूर जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुध्दा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची कुलदैवत नरसिंहपुर या ठिकाणी भेट घेतली.
यावेळी माजी मंत्री दत्तात्रय भरणे मामा उपस्थित होते.जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बोडके व इंदापूर तालुका उपाध्यक्ष सचिन चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे सांगण्यात आले की आमचा प्रश्न खूप दिवस झाले पेंडिंग आहे. त्यामुळे आमचे कामबंद आंदोलन चालू आहे.
यावर भाष्य करताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की तुमचा विषय मला पूर्ण माहित आहे,चांगला लक्षात आहे. यासाठी स्वतंत्र बैठक लावून लवकर निर्णय देणार आहे.
इंदापूर संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे,या प्रमुख मागण्यांसाठी १७ नोव्हेंबरपासून राज्यातील २८ हजार ग्रामपंचायत मधील 22 हजार संगणक परिचालकांनी संप पुकारला आहे.
त्यात इंदापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालक सहभागी झाले आहेत.त्याचा तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतवर परिणाम झालेला दिसून येत आहे.
संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून मागील १२ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक काम करत आहेत. शासनाने त्यांना ग्रामपंचायत सुधारित आकृतीबंध कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे, सदर दर्जा मिळेपर्यंत मासिक २० हजार मानधन देणे या प्रमुख मागण्यांकडे आश्वासन देऊनही दुर्लक्ष केले.
सुधारित आकृतीबंधाबाबत काहीच हालचाल झालेली नाहीत. शासन वेळकाडूपणा करत असल्याची भावना संगणक परिचालकांनी व्यक्त केली.
ग्रामपंचायत कर्मचारी,आशा सेविका,पोलीस पाटील व कोतवाल यांच्या मानधनात वाढ झाली आहे. परंतु संगणक परिचालकांकडे दुर्लक्ष केले जात आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.
मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरूच राहणार आहे,असे इंदापूर तालुका संगणक परिचालक संघटनेने सांगीतले.