दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : संत हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात,आज खऱ्या अर्थाने देशाला संत विचारांची गरज असल्याचे स्पष्ट करीत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे जीवनकार्य आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्राला ऊर्जा देणारे आहे. त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित ज्ञानेश्वरी आणि गाथा ग्रंथ समाजाला प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांनी आळंदी येथे व्यक्त केले.
आळंदीत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी “ओळख ज्ञानेश्वरीची” एक संस्कारक्षम उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचे शुभारंभ संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ.नारायण महाराज जाधव, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त एल.जी.घुंडरे, सुभाष महाराज गेठे, ज्ञानेश्वर वीर, उमेश महाराज बागडे, भागवत महाराज साळुंखे, अनिल वडगावकर, प्राचार्य दिपक मुंगसे, मुख्याध्यापक प्रदिप काळे, श्रीधर घुंडरे चरीत्र समितीचे सदस्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
संतांनी देखील आपल्या प्रबोधनातुन सामाजिक विचारांची पेरणी केली. म्हणूनच मनुष्याने या चांगल्या हेतूने कार्य केल्यास त्याचे फळ निश्चितच मिळते. प्रत्येकाने स्वविकास साधताना आणि स्वतःला घडविताना संतांची शिकवण अंगिकारल्यास निश्चितच सर्वांचा विकास होईल. यासाठी आपल्या विचारांची उंची राखून वर्तन करावे असे मत प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी व्यक्त केले.