२ सप्टेंबरला भंडारा तालुकास्तरीय खासदार सांस्कृतिक महोत्सव… — पारंपारिक नृत्याचा घडणार अविष्कार…

 

 

प्रितम जनबंधु

संपादक 

 

भंडारा: केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजन करण्याचे निर्देश असून याच पार्श्वभूमीवर वैनगंगा पांगोली सांस्कृतिक महोत्सव 2023 चे आयोजन भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात करण्यात आले असून 2 सप्टेंबर रोजी भंडारा तालुकास्तरीय पारंपारिक नृत्य, युवा व महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी संघांनी नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने केले आहे.

            खासदार सुनीलजी मेंढे यांच्याद्वारे आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील प्रतिभावंत कलाकारांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून आतापर्यंत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुकास्तरीय महोत्सवाच्या आयोजन पार पडले.

       शेकडो युवक,युवती आणि महिलांनी पारंपारिक नृत्याचे दर्शन घडवीत ग्रामीण भागातील कलेला लोकसभा स्तरावर पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. तालुकास्तरावर विजयी स्पर्धक आणि संघांना लोकसभा स्तरावर विजेतेपदासाठी कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

       भंडारा शहर आणि तालुक्याच्या युवा व महिला कलाकारांना ही संधी उपलब्ध होत असून 2 सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी सभागृह भंडारा येथे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आले आहे. 

        पारंपरिक लोक नृत्य, देशभक्तीवर आधारित सांघिक नृत्य सादर करता येणार आहेत. तालुकास्तरावर विजेत्या स्पर्धकांना आणि संघांना प्रथम पारितोषिक 15,000 रुपये , द्वितीय 7000 रुपये तृतीय 5000 रुपये देण्यात येणार आहे. तर लोकसभा स्तरावर विजयी होणाऱ्या संघांना प्रथम पारितोषिक 51000, व्दितीय 31000, तृतीय 15000 रुपये देण्यात येणार आहेत. 

            भंडारा शहर आणि तालुक्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होत कलेचे दर्शन घडवावे असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीने केले आहे.