ग्रामपंचायत स्तरावरील समस्यांचे यथाशिघ्र निराकरण करण्यात यावे… — गडचिरोली जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली :- अतिदुर्गम,आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची अवस्था अतिशय बिकट होत चालली असून स्थानिक नागरिक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात समन्वय साधून येत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विकास कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.भरीसभर शासकीय स्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या लोकाभिमुख योजना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता राबविण्यात येत असल्याने योजनेपासून वंचित नागरीकांच्या रोषाला स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

         ही वस्तुस्थिती लक्षात घेता विविध मागण्यांना घेऊन ग्रामपंचायत स्तरावरील समस्यांचे यथाशिघ्र निराकरण करण्याची मागणी गडचिरोली जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

          दिलेल्या निवेदनात संघटनेने नमुद केले आहे की शासन प्रशासनाच्या चुकिच्या धोरणामुळे ग्रामपंचायत अंतर्गत क्षेत्रात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना नागरीकांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.गडचिरोली जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आवास योजनेचा लाभ देतांना संपुर्ण ग्रामपंचायती व लाभिर्थी यांचा विचार न करता शासनाने निवड यादी जाहीर केली आहे.यात अनेक ग्रामपंचायतीतील गरजु व पात्र लाभार्थी वंचित राहिल्याने लाभार्थी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांत खडके उडु लागले आहेत.अनेक लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेचे हप्ते मिळाले नसल्याने याचा रोष स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर काढण्यात येत आहे.

        कंत्राटदारांना जलजिवन मिशन अंतर्गत देण्यात आलेली कामे संबंधित कंत्राटदार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मनमर्जी कामे करीत असुन चुकिच्या नियोजनामुळे ग्रामपंचायत अंतर्गत क्षेत्रातील रस्ते, नाल्यांची पुर्णता वाट लागली आहे.जिल्ह्यात ठक्कर बाप्पा निधी,दलित वस्ती सुधार निधी आणि नागरी जनसुविधेचा निधी संबंधित विभागाला प्राप्त झाला आहे.परंतु ग्रामपंचायतीकडे वळते करण्यात आले नसल्याने ग्रामपंचायतींना विकास कामे करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

          जिल्ह्यात पेसा,नाॅनपेसा प्रत्येक विभागात खुप मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने शिक्षण,आरोग्य,रोजगार आणि शासकीय कामात अडथळे निर्माण होत आहेत.ही गंभीर बाब लक्षात घेता गडचिरोली जिल्हा सरपंच संघटनेने एकुण १३ मागण्यांचे यथाशिघ्र निराकरण करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

           निवेदन जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी यांनी स्विकारले.यावेळी गडचिरोली सरपंच संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा नितीन राऊत, उपाध्यक्ष संदिप वरखडे,सचिव पुरुषोत्तम बावणे तसेच सरपंच संघटना सरपंच चक्रधर नाकाडे, सरपंच दादाजी वालदे सरपंच सुनिल सयाम,सरपंच अनिल दळांजे,उपसरपंच चेतन सुरपाम,सरपंच प्रदीप उसेंडी,सरपंच अमोल पुंघाटी,सरपंच गोपाल उईके,सरपंच प्रदीप मडावी,सरपंच भारती जुगनाके,सरपंच वनश्री भागडकर,सरपंच रुपलता बोदेले,सरपंच परसे गोडलवाही,सरपंच उषा शेडमाके,सरपंच पुनम किरंगे,सरपंच मोनिका पुडो आदी उपस्थित होते.