दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात‘ च्या 105 व्या भागात आवाहन केल्यानुसार 1 ऑक्टोबर रोजी आळंदीत “स्वच्छता ही सेवा” उपक्रमाअंतर्गत आळंदी नगरपरिषद व सेवा भावी संस्थांच्या माध्यमातून भव्य स्वच्छता श्रमदान मोहीम पार पडली असून १५०० पेक्षा जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवून साधारण 9 टन कचरा संकलित केल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
“एक तारीख एक साथ एक तास” या संकल्पनेतून आळंदी नगरपरिषेने केलेल्या आवाहनानुसार एम.आय.टी कॉलेज, डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज,इंद्रायणी सेवा फाऊंडेशन,नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान,आळंदी धाम समिती,भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण इकाई,श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था,पतंजली,आळंदी नगरपरिषदच्या चारही शाळांचे शिक्षक व विद्यार्थी या व इतर अनेक संस्थांनी व आळंदीकरांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता श्रमदान मोहिमेत सहभाग नोंदविला.इंद्राणी नदी घाट,भाजी मंडई,बस डेपो,केंद्रे महाराज मठ परिसर,सिद्ध बेट,काळे कॉलनी अश्या एकूण 10 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली गेली व यात एकूण 9 टन कचरा संकलित करून नगरपरिषद मार्फत तो कचरा डेपो वर प्रक्रिया करण्यासाठी नेण्यात आला.
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवून “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. स्वच्छता ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया असून “स्वच्छता ही सेवा” या अभियानातून प्रेरणा घेवून प्रत्येक नागरिकांनी उघड्यावर कचरा न टाकण्याचा व सार्वजनिक ठिकाणे देखील आपल्या घरासारखी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केल्यास आळंदी शहर स्वच्छ राहण्यास नक्की मदत होईल.