खेडी ते गोंडपिपरी रस्त्याच्या चुकीच्या बांधकामामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ…. — ठेकेदार व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा पवन निलमवार, प्रशांत उराडे यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार…

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

          मुल:- मौजा खेडी ते गोंडपिपरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील कित्येक वर्षापासून रखडलेले आहे. ठेकेदार व अधिकाऱ्याच्या संगणमताने सदर रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट सुरू आहे. याच्यातच अधिकाऱ्यांचे व ठेकेदाराचे कोणतेही नियंत्रण नसल्याने रस्त्यावर ठेकेदाराने कोणतेही दिशा निर्देशक व सूचना न लावता मर्जीने मोठमोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत. या खड्ड्यामुळे आजपर्यंत कित्येक प्रवाशांचे जीव गेलेले आहेत. बेंबाळ ते घोसरीच्या मधात जवळपास रस्त्यावरच वीस फुटांचे मोठे मोठे खड्डे खोदलेले आहेत. या खड्ड्यांना कोणतेही दिशा निर्देशक व सूचना दिल्या नसल्याने सुरेश नामदेवजी निलमवार, बेंबाळ यांचा खड्ड्यात पडून गंभीर अपघात झाला व ते दवाखान्यात उपचार घेत आहेत. संपूर्ण खेडी ते गोंडपिपरी रस्त्यावर कोणतेही सूचना, दिशानिर्देशक नसल्याने सरळ सरळ नागरिकांच्या अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत व परिसरातील लोकांचे जीव जात आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून याकडे ठेकेदार व अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे कित्येकांचे जीव जात आहेत. करिता अपघातात जखमी झालेले सुरेश नामदेवजी निलमवार यांच्या उपचारासाठी तात्काळ आर्थिक मदत करावी व चुकीच्या बांधकामामुळे ठेकेदार तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी तक्रार युवक तालुका काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार तसेच काँग्रेसचे युवा नेते प्रशांत उराडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली.

    जर सदर तक्रारीची दखल घेऊन तात्काळ गुन्हे दाखल करावे, रस्त्याचे बांधकाम तात्काळ पूर्ण करावे वअपघातात मृत पावले यांना व जखमींना आर्थिक मदत दिली नाही तर या विरोधात दि.१५/०५/२०२३ पासून तीव्र आक्रमक आंदोलन करण्यात येईल व संपूर्ण रस्ता चक्काजाम करण्यात येईल. असा इशारा संबंधित प्रशासनाला युवक काँग्रेसकडून देण्यात आला.