गरंडा जिल्हा परिषद शाळे तर्फे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त  अभिवादन….

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

          पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागा तर्फे संचालित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे माझी शाळा – माझे उपक्रम या उपक्रमांतर्गत महापुरुषांच्या जीवन चरित्राची ओळख व्हावी म्हणून ओळख थोरांची हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.

            या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

              याप्रसंगी मुख्याध्यापक खुशाल कापसे आणि सहाय्यक शिक्षक ओंकार पाटील यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली.

            श्रेयस मारोती वाटकर या विद्यार्थ्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची वेशभूषा साकारून “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” या स्वराज्य घोषणेला उजाळा दिला तर विवान गिरिधर क्षीरसागर या विद्यार्थ्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची वेशभूषा करून कामगाराचे महत्त्व सांगणाऱ्या” पृथ्वी ही शेषाच्या डोक्यावर नसून कामगारांच्या तळहातावर आहे” या गर्जनेची आठवण करून दिली.

            मुख्याध्यापक खुशाल कापसे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर तर सहाय्यक शिक्षक ओंकार पाटील यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. याप्रसंगी स्वयंपाकी प्रिया मेश्राम आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.