जिल्हा परिषद – नगर परिषद निवडणुका फक्त जिंकण्यासाठी लढणार – कार्यकर्त्यांचा संकल्प 

ऋषी सहारे 

   संपादक

         गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय स्तरावर फुले आंबेडकरी चळवळीची स्थिती आणि भविष्यातील राजकीय भूमिकेवर स्थानिक सर्किट हाऊस येथे बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी राज बन्सोड हे होते. विशेष अतिथी म्हणून धर्मानंद मेश्राम, ॲड. मेश्राम, विनोद मडावी उपस्थित होते.

           जिल्ह्यात बिरसा फुले आंबेडकर चळवळ राजकीय स्तरावर मजबूत करायची असेल आणि अस्तित्व निर्माण करायचे असल्यास आंबेडकरी पक्षांनी आगामी जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुका केवळ पक्षाचे अस्तित्व ठेवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढविल्या पाहिजेत अशी भूमिका ठेवत उपस्थित सर्वांनी एकमताने ॲड. चंद्रशेखर आझाद रावण यांच्या नेतृत्वात आझाद समाज पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

        त्यासाठी जनसंपर्क व जन आंदोलनाच्या माध्यमातून भ्रष्टाचार, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, नागरिक सोयी सुविधा या प्रमुख मुद्यावर काम करणार असल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी ठरविले.

        नुकताच लोकसभेमध्ये इंडिया किंवा महायुती मध्ये सामील न होता चंद्रशेखर आझाद रावण यांनी स्वतंत्र निवडणूक लढवून सुद्धा 1 लाख 51 हजार मताधिक्याने विजय मिळविला असून गेल्या 10 वर्षात जन आंदोलनातून आंबेडकरी राजकारणात देशभरात एक तरुण नेतृत्व म्हणून लोकप्रियता मिळविली. कांशीरामजी नंतर देशभरात संघर्षातून व आंदोलनातून तयार झालेला युवा नेतृत्व म्हणून खासदार रावण नावरूपास येत आहेत.

           त्यामुळे BRSP तुन बाहेर पडलेले सर्व पदाधिकाऱ्यांनी बऱ्याच नविन लोकांना सोबत घेऊन आझाद समाज पार्टी मध्ये प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या उपस्थितीत 13 जुलै रोजी पक्ष प्रवेश करणार असून लवकरच चंद्रशेखर आझाद गडचिरोली मध्ये जाहीर सभा होणार असल्याचे राज बन्सोड यांनी सांगितले. पक्षात काम करायची इच्छा असणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

           संचालन पुरुषोत्तम रामटेके तर आभार प्रितेश अंबादे यांनी केले. यावेळी जितेंद्र बांबोळे, नागसेन खोब्रागडे, हेमंत रामटेके, तारका जांभुळकर, शोभा खोब्रागडे, सविता बांबोळे, किशोर नरुले, घनश्याम खोब्रागडे, प्रकाश बन्सोड, पवन माटे, राजपाल खोब्रागडे, प्रणय दरडे, राहुल मेश्राम, मंगेश कांबळे, प्रतीक डांगे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.