
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
मौजा नेरी येथील डाकघर कार्यालय असून सदर कार्यालय हे बाजार चौकात बोलधने ज्वेलर्सच्या वरती पहिल्या मजल्यावर आहे.
सदर कार्यालयात कामकाजासाठी पायऱ्यांवरून चढ-उतार करताना वृध्दांसह सर्व नागरिकांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
त्यामुळे सदर कार्यालय हे खाली आणावे यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकदा मागणी केली.मात्र वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी मागणी पूर्ण झाली नाही.यामुळे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
नेरी हे मोठे बाजारपेठ असलेले व ग्रामीण क्षेत्राशी जोडलेले मोठे गाव आहे.या गावात एक डाकघर कार्यालय असून या कार्यालयाचे बँकिंग क्षेत्रात पर्दापण झाल्याने सदर कार्यालयात हजारो खातेदारांनी खाते काढले आहेत.
तसेच असंख्य नागरिक कामकाजनिमित्य कार्यालयात येत असतात.मात्र कार्यालय वरच्या मजल्यावर असल्याने पायऱ्या चढून जाण्यासाठी नागरिकांची दमछाक होत आहे.
तसेच भारत सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे हजारों लोकांचे निधी डाक कार्यालयात सरळ त्यांच्या खात्यात जमा होत असल्याने व्यवहार करण्यासाठी कार्यालयात जावे लागते.याचबरोबर लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यासाठी जावे लागते.
तद्वतच वयोवृद्ध नागरिकांना मानधन उचलण्यासाठी कार्यालयात जावे लागते आणि दैनंदिन व्यवहार करावा लागतो आहे.
त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे.या गंभीर बाबींची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन डाकघर कार्यालय खाली म्हणजे खालच्या मजल्यावर आणावे अशी मागणी नागरिकांची आहे.