निवडणूक यंत्रणेचा आढावा… — निवडणूकीची कामे जबाबदारीपूर्वक पूर्ण करा :- जिल्हाधिकारी 

ऋषी सहारे

  संपादक

गडचिरोली – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नेमून दिलेली कामे नियमांचे पालन करून जबाबदारीपूर्वक व विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी आज दिले.

         गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक विषयक विविध कामे सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वय अधिकारी व सहाय्यक यांना नेमून दिलेल्या कामकाजाच्या अनुषंगाने श्री संजय मीणा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेतला. उप जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा सूचना अधिकारी एस.आर. टेंभुर्णे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, तहसिलदार प्रीती डुडुलकर आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

        या बैठकीत भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणूकीचे कामकाज टप्पेनिहाय पार पाडण्यासाठी दिलेल्या कालमर्यादेची माहिती देण्यात आली. कामकाज करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. कामे नेमून दिलेल्या विषय समितीने कोणकोणती कामे करावी याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

         निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्हाधिकारी मीणा यांनी विविध शाखानिहाय समन्वयक व सहाय्यक अधिकारी कर्मचारी नेमले आहेत. यात पत्रव्यवहार, नामनिर्देशन, आय.टी. सेल, वाहतूक व्यवस्था, मतपत्रिका, निवडणूक साहित्य, आदर्श आचार संहिता, मतदार यादी, प्रसिद्धी, इ.व्ही.एम. सुरक्षा कक्ष, निवडणूक खर्च, मतदार मदत केंद्र, मनुष्यबळ व्यवस्थापन आदि २७ शाखांचा समावेश आहे.