कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी :- विद्यार्थी, शिक्षक व समाजाकरीता शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘वेध प्रतिष्ठान, नागपूर, द्वारा शिक्षण व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले असून पुरस्कार वितरण सोहळा ५ मार्च २०२३ ला संपन्न होणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीसाठी असलेला रोख रुपये पाच हजार, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे स्वरूप असलेला ‘शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार, उमरेड येथे विद्यार्थ्यांसाठी वाचनालय चालविणारे गांधीवादी कार्यकर्ते बंडू शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी रोख एकविसशे रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह,शाल व श्रीफळ असे स्वरूप असलेला ‘बोलीमहर्षी डॉ.हरिश्चंद्र बोरकर साहित्यवेध पुरस्कार, झाडीबोली आणि प्रमाणभाषेत साहित्य निर्मिती करणारे झाडीबोली साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ॲड.लखनसिंह कटरे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा ५ मार्च २०२३ ला दुपारी १:३० वाजता ‘अर्पण सभागृह, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृह, मोरभवन, सीताबर्डी,नागपूर’ येथे संपन्न होणार आहे असे वेध प्रतिष्ठान नागपूरचे अध्यक्ष डॉ.मनोहर नरांजे, सचिव खुशाल कापसे यांनी एका निवेदनाद्वारे कळविले आहे.